जिल्ह्याभरात ५ हजारांहून अधिक फोर्स तैनात
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गणेशोत्सवाचा उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, हा उत्सव नागरिकांनी शांततेत आणि आनंदात साजरा करावा, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने व्यापक तयारी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रत्येक पातळीवर दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा पोलीस दलाचे ३ हजार ४०० अधिकारी, कर्मचारी, १ हजार ८०० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या तुकड्या अशा ५ हजारांहून अधिक फोर्सची संख्या जिल्ह्याभरात तैनात केली आहे. विशेषतः १६० गावांमध्ये “एक गाव, एक गणपती” उपक्रमांतर्गत होणाऱ्या मूर्ती स्थापना आणि मिरवणुकीसाठी स्वतंत्र नियोजन आखले आहे. उपद्रवी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवरही पोलीस दलाने तात्काळ कारवाई केली आहे. १० जणांवर तडीपारची आणि एका व्यक्तीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. याशिवाय २५५ उपद्रवींना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे. जेणेकरून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये.
सोशल मीडियावर होणारी अफवा व आक्षेपार्ह मजकुराची देवाणघेवाण लक्षात घेता, कोणताही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अशा पोस्टवर प्रतिक्रिया देणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या ग्रुप अॅडमिनवरही कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, असा स्पष्ट इशारा देऊन तसे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना ‘एसपींचे’ आवाहन
गणेशोत्सव समाजात एकात्मता आणि शांततेचा संदेश देणारा असावा. उत्सवाचा आनंद घ्या. मात्र, तो कोणाच्याही भावनांना वेदना पोहोचविणारा किंवा कायदा सुव्यवस्थेला धक्का देणारा नसावा. कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी, असेही पोलीस अधीक्षकांनी सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट आवाहन केले आहे.