गुणवंत पाल्यांसह सेवानिवृत्त सदस्य अभियंत्यांचाही सत्कार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात यंदाही भारतीय अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीतर्फे सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी तथा विशेष सत्कारार्थी क.ब.चौ.विद्यापीठाचे चवथे कुलगुरु डॉ.के.बी.पाटील तर राज्याचे सेवानिवृत्त प्रधान सचिव महेश झगडे प्रमुख वक्ते होते. याप्रसंगी उत्कृष्ट अभियंत्यांना पुरस्काराने सन्मानित करुन गुणवंत पाल्यांसह सेवानिवृत्त सदस्य अभियंत्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, जळगाव तापी पा.वि.म.चे कार्यकारी संचालक जयंत बोरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ज.पा.प्र.मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक संतोष भोसले, शासकीय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त प्राचार्य महेंद्र इंगळे, अभियंता पतपेढीचे मुख्य प्रवर्तक तथा आजीव अध्यक्ष साहेबराव पाटील, म्हसावद येथील इंग्लिश मीडियम स्कुलच्या अध्यक्षा तथा संस्थापिका प्रा.विमल वाणी, सा.बा.वि. क्र.२ चे कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा, पतपेढीचे चेअरमन प्रमोद पाटील, व्हा.चेअरमन चंद्रशेखर तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला दीपस्तंभ मनोबलचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात महेश झगडे यांनी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशासकीय सेवेतील अनुभव’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच पुष्पगुच्छ भेट देण्याऐवजी कुलगुरु के.बी.पाटील यांचे ‘सुटलेली गणितं’ आणि महेंद्र इंगळे यांचे ‘अभियांत्रिकी स्पंदने’ ही पुस्तके भेट देण्यात आली. सुरुवातीला स्वागत गीत प्राची पाटील तर प्रा.विमल वाणी यांनी ‘आधुनिक भारुड’ सादर केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन अभियंता डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अभियंत्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले.
यावेळी ‘उत्कृष्ट अभियंता’ गौरव पुरस्काराने ज.पा.प्र.मंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता यशवंतराव काशिनाथ भदाणे, सा.बां.वि.चे कार्यकारी अभियंता राहुल देवीदास पाटील तर ‘विशेष गौरव’ पुरस्काराने खेलो इंडिया युथ गेम्स, युवा बॉक्सर सुवर्ण पदक विजेती तथा यावल तालुक्यातील किनगावची रहिवासी दिशा विजय पाटील, भुसावळ येथील धनश्री प्रभात कॉलनीतील ‘प्रणिता प्रतिष्ठान’ यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीचे संचालक कामेश पाटील, आरती सूर्यवंशी, स्वाती नन्नवरे, सचिन पाटील, हेमंत पवार, सुभाष चव्हाण, ब्रह्मानंद तायडे, तुषार राजपूत, कुलदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्राची पाटील, हर्षल पाटील प्रास्ताविक तथा आभार साहेबराव पाटील यांनी मानले.