राज्यस्तरीय रॅंकिंगला जळगाव ग्रामीण विधानसभा प्रथम ; पश्चिम जिल्ह्याने सर्वोत्तम संघटनात्मक जिल्हा म्हणून सलग तिसऱ्यांदा पटकावला मान
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन की बात” कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी थेट संवाद साधतात. समाजातील प्रेरणादायी घटना, सकारात्मक उपक्रम आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देत ते जनतेला प्रेरित करतात. उपक्रमात देशभरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बूथस्तरीय कार्यक्रमांद्वारे नागरिकांना “मन की बात” ऐकण्याची संधी उपलब्ध करून देतात. रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या १२७ व्या संस्करणात जळगाव पश्चिम जिल्हा भाजपने संघटनात्मक उत्कृष्टता दाखवत राज्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जळगाव पश्चिम जिल्हा भाजप अंतर्गत ८ तालुके, ५ विधानसभा आणि २० मंडळातील एक हजार ७०७ बूथांपैकी तब्बल एक हजार ४९१ बूथांवर “मन की बात” कार्यक्रम सामूहिकरित्या ऐकण्यात आला.
भाजपच्या “सरल ॲपवरून कार्यक्रमाचे रिपोर्टिंग करण्यात आले आहे. केंद्रीय कार्यालयाने जारी केलेल्या राज्यस्तरीय अहवालात जळगाव पश्चिम जिल्हा महाराष्ट्रातील सर्वोत्तम संघटनात्मक जिल्हा ठरला आहे आणि तेही सलग तिसऱ्यांदा. राज्यस्तरीय विधानसभा रँकिंग अहवालानुसार क्रमवारीत जळगाव ग्रामीण-१, चाळीसगाव-३, अमळनेर-४, एरंडोल-६, पाचोरा-८ यांचा समावेश आहे. अशा उल्लेखनीय यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, विजयराव चौधरी, रवीजी अनासपुरे, खा.स्मिताताई वाघ, आ.राजूमामा भोळे, आ.मंगेश चव्हाण, आ. अमोल जावळे यांनी अभिनंदन केले आहे.
परिश्रम, नियोजन अन् संघभावनेचे प्रतीक
भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण, नेते तथा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पश्चिम जिल्हा संघटनात्मक कार्यात अढळ स्थान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हे यश कार्यकर्त्यांच्या परिश्रम, नियोजन आणि संघभावनेचे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया या यशाबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी दिली आहे. मन की बात अभियानाचे यशस्वी नियोजन, आयोजन आणि रिपोर्टिंग करणाऱ्या सर्व बूथ, मंडल आणि जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचे त्यांनीही अभिनंदन केले आहे.



