साईमत / जळगाव / प्रतिनिधी
राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर त्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला असून जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजही परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने १९ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारी ३ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गेल्या आठवड्यात ४० अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना अचानक हवामान बदलाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली असून गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३६ अंशांवर आले आहे.
दरम्यान, या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतीला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आणि मका ही पिके सध्या काढणीच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कापणी केलेल्या पिकांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी शेतकरी धावपळ करत आहेत, तर शेतात उभ्या पिकांबाबत चिंता वाढली आहे.
