साईमत, प्रतिनिधी, जळगाव
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला असून या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. त्याचे औचित्य साधून यावर्षी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या संकल्पनेला जनमाणसापर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका युवासेनेतर्फे जळगाव ग्रामीणमध्ये ‘माझी माती माझा देश’ हे अभियान उत्साहात राबविण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ‘माझी माती माझा देश’ या अभियानांतर्गत सोमवारी तरुणाईतर्फे निसर्गाच्या साक्षीने पंच प्रण प्रतिज्ञा घेण्यात आली. युवासेनेचे उपतालुका प्रमुख स्वप्निल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तरुणाईने हातात माती घेऊन पंच प्रण प्रतिज्ञा घेतली. यावेळी जितेंद्र बाविस्कर व चंद्रकांत सोनवणे यांनी सदर उपक्रमासह वसुधा वंदन, विरांचे वंदन, वृक्षारोपण व संवर्धन आदी उपक्रमांबद्दल माहिती विशद केली. सदर अभियान यशस्वीतेसाठी चंद्रकांत सोनवणे, रितेश कोळी, विशाल सोनवणे, गणेश कोळी, जितेंद्र बाविस्कर, किशोर सोनवणे, शुभम सोनवणे, नामदेव कोळी, राकेश धनगर, कुणाल कोळी, अक्षय सोनवणे आदींसह तरुणाईने उपस्थिती दर्शविली.
यावेळी तरुणाईने “आम्ही अशी शपथ घेतली आहे की, भारताला विकसित देश बनवायचे आहे तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृध्द वारसाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकाचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे.” अशी पंच प्रण प्रतिज्ञा तरुणाईने घेतली. त्यानंतर सेल्फी व फोटो काढून केंद्र सरकारच्या ‘मेरी माती मेरा देश’ या उपक्रमाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आले व सदर अभियान यशस्वीरित्या पार पाडले.