चैत्र शुद्ध प्रतिपदा : हजारो साधक-भक्तांसह भव्य स्वागत यात्रा
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी –
चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्षाच्या शुभ अवसरानिमित्त जळगाव शहरात जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आयोजित स्वागत यात्रा भव्यतेने पार पडली. शहरातील प्रमुख मार्ग भगव्या रंगाने न्हालेल्या आणि हजारो साधक-भक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले.
यात्रेचे आयोजन जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या वतीने करण्यात आले होते. चिमुकले राममंदिर येथून सुरू झालेल्या यात्रेने शिवाजी पुतळा चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे शाळा, सुभाष चौक मार्गे ग्रामदैवत श्रीराम मंदिर रथ चौक येथे आपली सांगता केली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात्रेचे मनापासून स्वागत केले.
यात्रेच्या प्रारंभी रथामध्ये गुरुपूजन करून कार्यक्रमाची विधीशीर सुरुवात झाली. यावेळी आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते यात्रेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास विजय लक्ष्मण बांधेल, धर्मराज फाउंडेशनचे विनायक भाऊ पाटील, नगरसेविका पूजा विजय जगताप, तसेच जिल्हा निरीक्षक गणेश राकडे, उत्तर महाराष्ट्र उपपीठ प्रसिद्धी प्रमुख डिगंबर टोके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल दांगोडे, जिल्हा महिला अध्यक्षा उषाताई कोळी, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. बोरसे, नरेंद्र खाचणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यात्रेत आकर्षक बॅनर, निशानधारी महिला-पुरुष, बँड पथक, कलशधारी महिला आणि पारंपरिक वेशातील वासुदेव यांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले. श्रीराम पंचायतनाचे दृश्य, तसेच मरणोत्तर देहदान व अवयवदान यांसारख्या सामाजिक संदेशांचे दृश्य सादर करून समाजप्रबोधनाचा संदेश दिला गेला. याशिवाय जय मल्हार, संत गजानन महाराज, भारत माता यांचे दृश्य, लेझीम पथक आणि भजनी मंडळांनी संपूर्ण वातावरण भारावून टाकले.
यात्रेत सहभागी भक्तांनी हिंदू धर्माचे संवर्धन आणि सामाजिक जाणीव या संदेशावर भर दिला. संपूर्ण शहरात भगव्या रंगाची उधळण झाली, तर या प्रकारच्या स्वागत यात्रांचा व्यापक भौगोलिक प्रभाव – महाराष्ट्रासह गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, बिहार, जम्मू-काश्मीर तसेच परदेशातही होत असल्याचे दिसून आले.
रामानंद संप्रदाय, जिल्हा जळगाव यांच्या वतीने आयोजित या यात्रेत सर्व तालुक्यांमधील सेवा समित्या, सेवा केंद्र समित्या तसेच साधक-भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. या भव्य आयोजनामुळे जळगाव शहरात नववर्षाचे स्वागत धार्मिक आणि उत्साही वातावरणात साजरे करण्यात आले.
