स्पर्धेत राज्यभरातून २४३ खेळाडूंचा सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजित योनेक्स सनराईज जी.एच.रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंटचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमेंटन हॉल येथे नुकतेच झाले. ही स्पर्धा रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स ॲण्ड कल्चर प्रायोजित व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जळगाव जिल्हा क्रीडा संघ सहप्रायोजित महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेकडून मान्यता प्राप्त आहे. ही स्पर्धा २४ ते २८ डिसेंबर दरम्यान होत आहे.
उद्घाटनाप्रसंगी रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स ॲण्ड कल्चरचे प्रीती अग्रवाल, जी. एच. रायसोनी कॉलेजचे रफिक शेख, जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे सहसचिव सचिन गाडगीळ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य पंच ब्रिजेश गौर, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे शेखर जाखेटे, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी उपस्थित होते. मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
संपूर्ण राज्यातून जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना जळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रीती अग्रवाल यांनी खेडाळूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील २४३ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. हे खेळाडू ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षाआतील मुले व मुली एकेरी तसेच १९ वर्षावरील खुलागट आणि ३५ वर्षावरील वरिष्ठ गटमधील पुरुष व महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी गटात खेळत आहे. स्पर्धेत विजयी व उपविजयी होणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सूत्रसंचालन तथा आभार सचिव विनित जोशी यांनी मानले.
