साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरालगत मोहाडी शिवारातील एकलव्य नगर परिसरातील अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महापौर दीपमाला काळे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येईल, अशी ठाम भूमिका मांडली.
मागील अनेक वर्षांपासून आदिवासी भिल्ल बांधवांनी झोपड्या उभारून वास्तव्य केले असून ते सुमारे २० वर्षांपासून येथे राहत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला त्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून झोपड्या कोणत्याही परिस्थितीत हटवू देणार नसल्याची आक्रमक भूमिका आधीच त्यांनी घेतली आहे.
नुकतेच महापालिकेचे पथक अतिक्रमण हटविण्यासाठी गेले असता महिलांसह नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे कारवाई विना परतली. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी झोपड्यांसाठी जागा विक्री केल्याचा संशय व्यक्त होत असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढील दोन-तीन दिवसांत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “आमच्या जागेवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत कायम राहू देणार नाही. जर कोणत्याही प्रकारे झोपड्यांसाठी जागा विकली गेली असेल, तर त्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”
स्थानिक रहिवासी महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये तणाव वाढल्याने, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचे निष्कर्ष काय येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
