गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह तिघे जेरबंद
साईमत जळगाव प्रतिनिधी:
शहरातील अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारी कारवायांविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलीसांनी केलेल्या धाडसिक कारवाईत तिघे संशयित जेरबंद झाले. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुस आणि एक महागडी दुचाकी जप्त केली आहे. एकूण जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांच्या आसपास आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता जळगाव-संभाजीनगर रोडवरील एअरपोर्ट समोरच्या नेस पार्कजवळ पोलीस गस्त घालत होते. यावेळी एका दुचाकीवरून तीन संशयित येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा दिला असता, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे विना परवाना बाळगलेले दोन गावठी बनावटीचे कट्टे आणि दोन जिवंत काडतुस सापडल्या. तसेच, त्यांच्या ताब्यातील १ लाख रुपयांची पल्सर दुचाकी (क्रमांक: एमएच २० डीआर २७७६) आणि एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.
या कारवाईत जेरबंद झालेल्या संशयितांमध्ये दिपक ठकुबा गुंजाळ (वय २८, रा. सिल्लोड), विठ्ठल रंगनाथ सोनवणे (वय २५, रा. सिल्लोड) आणि अजय विरजू गांगुर्डे (रा. जळगाव) यांचा समावेश आहे. एमआयडीसी पोलीसांनी या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ही कारवाई शहरातील सुरक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांचे प्रतीक ठरली असून, नागरिकांना सुरक्षिततेची खात्री देण्यास महत्त्वाची ठरली आहे.
