साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कुंटणखान्यावर पोलिसांनी मंगळवारी रात्री अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत कुंटणखाना चालवणारी एक महिला व तिच्या साथीदार असलेल्या दोन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या ठिकाणी अडकवून ठेवण्यात आलेल्या पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे.
एमआयडीसीतील निलंबरी हॉटेलच्या मागील बाजूस तसेच हॉटेल सुमेर सिंगच्या समोर असलेल्या भागात दीर्घकाळापासून अवैध देहविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने तातडीने हालचाली सुरू करत, नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईचे आदेश दिले.
उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले; मात्र पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणत कुंटणखाना चालवणाऱ्या महिला आरोपीसह दोन पुरुषांना ताब्यात घेतले. घटनास्थळाची झडती घेतली असता तेथे पाच महिलांना जबरदस्तीने ठेवून देहविक्रीस भाग पाडले जात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी या पाचही पीडित महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची वैद्यकीय तपासणी व समुपदेशनाची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून, या रॅकेटमागे आणखी कोणी आहे का, याचा सखोल तपास केला जात आहे.
एमआयडीसीसारख्या औद्योगिक परिसरात अशा प्रकारचा बेकायदेशीर धंदा सुरू असल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच ठेवावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस पथकाकडून वेगाने सुरू आहे.
