साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील विविध भागांत सलग घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती अखेर दूर झाली असून, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठी कारवाई करत एका आंतरराज्यीय अट्टल चोरट्याला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. या चोरट्याने जळगाव शहरात केलेल्या घरफोड्यांची कबुली देत, गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणखी पाच साथीदारांची नावेही उघड केली आहेत.
गेल्या महिनाभरात जळगाव शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन करून तपासाला गती देण्यात आली.
पथकाने तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयितांचा माग काढला. या सखोल तपासातून आरोपी मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील कुक्षी तालुक्यात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. अखेर एलसीबीच्या पथकाने तेथे सापळा रचून रमेश भुरूसिंग अनारे (वय २७) या आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत रमेश अनारे याने जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चार घरफोडीच्या गुन्ह्यांची स्पष्ट कबुली दिली. याचबरोबर, या चोरीच्या घटनांमध्ये मध्यप्रदेशातील त्याचे पाच साथीदार—कुंद्या डावरीया, बरदान देवका, कालु डावरीया, राहुल डावरीया आणि सुनिल परमाती—यांचा सक्रिय सहभाग असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्याने दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचे आंतरराज्यीय जाळे उघडकीस आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपी रमेश अनारे याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पुढील तपास करत आहेत. उर्वरित साथीदारांचा शोध घेण्यासाठीही पोलिसांची पथके कार्यरत असून, लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या यशस्वी कारवाईमुळे जळगाव शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेली ही ठोस पावले कौतुकास्पद मानली जात आहेत.
