महापौर दीपमाला काळे नेतृत्वाखाली प्रशासनाची कडक कारवाई सुरू; वाहने हटवली नाहीत तर थेट जप्ती! १ एप्रिलपासून प्रशासनाची कडक कारवाई
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील वाहतुकीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या महामार्गावरील अतिक्रमणावर महापौर दीपमाला काळे यांनी कडक पाऊल उचलले आहे. खेडी ते खोटे नगर दरम्यानच्या महामार्गावर दुतर्फा लावण्यात आलेली वाहने हटवण्यासाठी संबंधित वाहनधारकांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून वाहने हटवली नाहीत तर जप्तीची कठोर कारवाई केली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
बुधवारी महापौरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त धनश्री शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, ‘नही’चे अधिकारी राहुल पाटील आणि अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर उपस्थित होते. या बैठकीत ठरवण्यात आले की, महामार्गाचा काही भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (नही) हद्दीत येतो, त्यामुळे महापालिका, ‘नही’ आणि वाहतूक पोलीस एकत्र येऊन १ एप्रिलपासून वाहने हटवण्याची संयुक्त मोहीम राबवतील.
महामार्गालगत असलेले कार व दुचाकी बाजार देखील १ एप्रिलपासून पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या मदतीने हटवले जाणार आहेत. यासोबतच शहरात पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी ३० मार्चपासून रस्त्यांवर पिवळे व पांढरे पट्टे आखून पार्किंग स्पॉट निश्चित केले जातील. फेरीवाल्यांना रस्त्यावरून हटवून त्यांना मनपाच्या पडीक जागांवर ‘खाऊगल्ली’ विकसित करून दिली जाईल.
महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या:
“सात दिवसांच्या आत आपली वाहने महामार्गावरून स्वतःहून काढून घ्यावीत. रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा १ एप्रिलपासून जप्तीची कठोर कारवाई अटळ आहे. शहरातील इतर अतिक्रमण देखील लवकरच उचलण्यासाठी नियोजन केले आहे आणि पर्यायी जागा ठरवून दिल्या जातील.”
याप्रकारे जळगाव महामार्ग लवकरच अतिक्रमणमुक्त होण्याची शक्यता असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.
