साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगावातील ड्रग्ज प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. विधिमंडळात ड्रग्ज प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोपीच्या संपर्कात असणारे तथा एलसीबीचे वादग्रस्त ठरलेले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना अखेर निलंबित केले आहे. अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे ही कारवाई झाली आहे. जळगावच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपीच्या संपर्कात असणारे दत्तात्रय पोटे यांचे निलंबन केले आहे. ड्रग्ज प्रकरणात दुबईत फरार असलेला म्होरक्या अबरार कुरेशी (शेख) या संशयिताबरोबर २५२ वेळा संपर्क केले असल्याचे रेकॉर्डिंग समोर आले आहे. त्यामुळे पोटे यांच्यावर ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोटे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. याप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दत्तात्रय पोटे यांचे ड्रग्ज विक्रेत्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली आहे. त्यात दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
चौकशीत निष्पन्न झाल्यावर
विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून कारवाईचा इशारा
याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. चौकशीत निष्पन्न झाल्यावर कारवाई करण्याचा इशाराही विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील, पाचोरा-भडगावचे आ.किशोर पाटील, अमळनेरचे आ.अनिल पाटील यांनीही विधिमंडळात आवाज उठविला आहे. त्यामुळे विधिमंडळात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजले आहे. दरम्यान, शिंदे सेनेच्या आमदारांनीही सरकारला घेरले आहे. तसेच सत्ताधारी आमदार मंत्र्यांवर आक्रमक झाले होते. त्यांनी अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केल्यामुळे अखेर पोटे यांना निलंबित केले आहे.