अडावदजवळील खुनाची जळगाव गुन्हे शाखेकडून उकल : चौघे ताब्यात

0
28

गांजा पिल्याच्या वादातून घडली घटना : सात दिवसात ठोकल्या बेड्या

साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

तालुक्यातील अडावद येथे शेतमजूराच्या झालेल्या खुनानंतर अडावद पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संशयित गांजा पित असताना त्यांना हटकल्यानंतर त्यातून झालेल्या वादातून मजूराचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल करणाऱ्या तपास पथकाला पोलीस रिवॉर्ड देत त्यांचा गौरव केला.

सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील अडावद गावालगतच्या पीक पाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जगदीश फिरंग्या सोलंकी (वय ४५, रा.पाटचारी, अडावद, ता.चोपडा) याचा खून करून मृतदेह फेकण्यात आला होता. मयताला मारहाण झाल्याचे अंगावरील वळांवरून स्पष्ट झाल्यानंतर मयताचा मुलगा ईश्वर जगदीश सोलंकी (वय २०, रा.पाटचारी, अडावद) याच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना मयत जगदीश सोलंकी यांचा गांजा ओढणाऱ्यांसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, ते मुस्लिम कब्रस्थानाजवळ गांजा पित असताना मयताने तुम्ही येथे गंजोटी का बसले आहात ? अशी विचारणा केली व त्याचा राग येवून संशयित ईरफान अब्दुल तडवी, शाहरूख ईस्माईल तडवी, शेख मोईन शेख मजीद, कलिंदर रशीद तडवी (सर्व रा.अडावद) यांनी जगदीश सोलंकी याच्या मोटारसायकलला लाथ मारुन खाली पाडले. जगदीश हा पळू लागल्याने त्यास कब्रस्थानमधील बांधकाम केलेल्या व्हरांड्यात रूममध्ये नेल्यानंतर संशयितांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी कलिंदर रशीद तडवी याने दोरीने गळा आवळून ठार मारले. मृतदेह हजरत पीर पाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर आणून टाकला.

तपासकामी अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनरीक्षक राजू थोरात, सहायक फौजदार शरीफ तडवी, हवालदार भरत नाईक, शेषराव तोरे, अनवर तडवी, संजय धनगर, ज्ञानेश्वर सपकाळे, पोलीस शिपाई सतीश भोई, अक्षय पाटील, शुभम बाविस्कर, भूषण चव्हाण यांनी सहकार्य केले.

आरोपींना १० पर्यंत सुनावली पोलीस कोठडी

संशयित आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने मंगळवारी, १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here