साईमत, यावल : प्रतिनिधी
जळगाव, भुसावळ, यावल, न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयाचा तथा रुग्णसेवेचा पदभार एकाच वैद्यकीय अधीक्षकावर असल्याने यावल ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे सोमवारी, १५ जानेवारी २०२४ रोजी यावल ग्रामीण रुग्णालयात एका मयत व्यक्तीचे एकाच दिवशी तेही (३ ते ४ तासाच्या आत मयत व्यक्तीचे शव पुन्हा ग्रामीण रुग्णालयात आणून) दोन वेळा शव विच्छेदन करण्याची वेळ डॉक्टरवर का..? आली. याबाबत वैद्यकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी कुटुंब नियोजन शिबिर घेण्यात आले. त्याची व इतर विविध आरोग्य सेवेची, होत असलेल्या कार्यक्रमांची माहिती रुग्णांना ज्ञात होण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांनाही दिली जात नसल्याने रुग्णांसह प्रसिद्धी माध्यमांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा खुलासा जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक यांनी करायला पाहिजे आणि त्यांनी खुलासा न केल्यास राजकीय प्रभावामुळे ते गप्प आहेत का..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यावल ग्रामीण रुग्णालयात पोलिसांच्या सूचनेनुसार आणि कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यासाठी एकाच दिवशी एकाच व्यक्तीचे दोन वेळा शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत रुग्णालयात शवविच्छेदन कोणी केले का केले..? हा प्रश्न उपस्थित झाल्याने याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कुरकुरे यांनी भ्रमणध्वनीवरून दैनिक ‘साईमत’शी बोलताना त्यावेळेस ते भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात असल्याचे सांगितले. त्यांनी दुजोरा दिला असला तरी शवविच्छेदन करताना वैद्यकीय क्षेत्रात नियमानुसार निश्चित असा नमुना असतो. तो संबंधित डॉक्टरला शिवविच्छेदन करताना भरावा लागतो ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही का..? आणि कशामुळे एकाच व्यक्तीचे दोन वेळा सेवा विच्छेदन करावे लागले, असा प्रश्न उपस्थित होतो.
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एकाच वैद्यकीय अधीक्षकाकडे जळगाव, भुसावळ, न्हावी, यावल या ग्रामीण रुग्णालयाचा पदभार दिला कसा..? ते या चारही ठिकाणी सेवा कशी देऊ शकता त्यांच्या कार्यक्षमतेच्या बाहेर पदभार दिले गेले आहेत का..? किंवा चारही रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वैद्यकीय अधीक्षक कुरकुरे यांच्या आदेश व सूचनांचे पालन करीत नाहीत का..? ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत सुविधा असल्या तरी विविध प्रकारच्या रुग्णसेवा आणि होणाऱ्या शिबिरांबाबत रुग्णांना वेळेवर माहिती मिळण्यासाठी यावल ग्रामीण रुग्णालयातून कोण कोणते प्रयत्न केले जातात. तसेच प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली जात नसल्याने रुग्णांसह प्रसिद्धी माध्यमात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याकडे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष केंद्रित करून रुग्णांना आरोग्य सेवेची माहिती वेळेवर मिळण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.



