साईमत प्रतिनिधी
पुनीत बालन यांच्या सौजन्याने आयोजित ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी २०२५-२६ या भव्य स्पर्धेला जळगाव शहराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि जळगाव जिल्हा हौशी ज्यूदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने १ आणि २ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन आज (१ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात झाले. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील सुमारे ३५० मुले-मुली सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे अध्यक्ष विष्णूभाऊ भंगाळे (माजी महापौर) आणि सचिव डॉ. उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा ज्यूदोमय झाला आहे.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना ज्यूदो खेळातील कौशल्य विकसित करण्याची अनोखी संधी मिळाली आहे तसेच ग्रामीण भागातही या खेळाचा प्रसार वाढीस लागला आहे.
उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक, सचिव दत्ता आफळे, खजिनदार रवींद्र मेटकर,
जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी रवींद्र धर्माधिकारी, पारोळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण,
गणेश सहकारी संस्थेचे संचालक अनिल देशमुख, आंतरराष्ट्रीय पंच विजय यादव, टुर्नामेंट डायरेक्टर अमोल देसाई,
राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप तळवेलकर,
तांत्रिक सदस्य अतुल बामनोडकर, सचिन देवळे, वृषाली लेग्रस,
महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. विकास पाटील,
तांत्रिक समितीच्या अध्यक्षा दर्शना लखानी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक यांनी सांगितले की,
“जळगाव जिल्ह्यात होणारी ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून, ज्यूदोच्या प्रगतीचा उत्सव आहे.
ग्रामीण आणि शहरी खेळाडूंना एकत्र आणून महाराष्ट्रात ज्यूदो खेळाचा नवा अध्याय लिहिला जातो आहे.”
सचिव डॉ. उमेश पाटील, योगेश महाजन, अतुल गोरडे, अजय काशीद, डिंगबर महाजन, सचिन वाघ,
डॉ. चांद खान, अशफाक शेख आणि पदाधिकारी वर्ग यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती पाटील आणि महेश पाटील यांनी केले.
या दोन दिवसीय स्पर्धेचा समारोप उद्या (२ नोव्हेंबर) भव्य कार्यक्रमाने होणार आहे.
समारोप प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील,
राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार व सुप्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम,
खासदार स्मिताताई वाघ, तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वेळी विजेत्या खेळाडूंचा सत्कार, पारितोषिक वितरण आणि ज्यूदो संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गौरव केला जाणार आहे.
ही राज्यस्तरीय स्पर्धा जळगाव जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच ज्यूदो खेळाचा प्रसार ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
या स्पर्धेद्वारे होत आहे.
महाराष्ट्रातील ज्यूदो खेळाडूंच्या भावी वाटचालीसाठी जळगाव जिल्हा नवा प्रेरणास्रोत ठरणार आहे,
असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



