जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीची ३८ वी सर्वसाधारण सभा उत्साहात
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जगात प्रतिकूल परिस्थिती असताना ५०० कोटीची पाईप आणि इतर उत्पादने निर्यात व ३५० कोटींची फळप्रक्रिया उद्योगांमध्ये जैन इरिगेशन कंपनीने निर्यात केली. पाईप, सूक्ष्मसिंचन, टिश्यूकल्चर, फळ भाजीपाला प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक शिट व सौलर विभागातून सकारात्मक दृष्टीने वाटचाल करत भविष्यात एक हजार कोटींचे निर्यातीचे उद्दिष्टे कंपनीचे आहे. ‘सहनशक्तीने रूजलेले, उत्कृष्टतेत फुलणारे’ संकल्पनेच्या आधारावर भारतातील १४ कोटी शेतकऱ्यांपैकी एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत कंपनी पोहचली आहे. गुणवत्ता व विक्री पश्चात सेवेतून मिळालेल्या विश्वासावर कंपनी खरी ठरली आहे. शेत, शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी जगातील सर्वात्तम तंत्रज्ञान अल्पभुधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचेही कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले. बांभोरी येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळीवर ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन होते. यावेळी अनिल जैन यांनी भागधारक, सहकारी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, कंपनी सचिव अवधुत घोडगावकर, लेखापरीक्षक नविंद्रकुमार सुराणा, जैन फार्मफ्रेश फुडूस लि. चे संचालक अथांग जैन, अभंग जैन होते. सभेवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वतंत्र संचालक अशोक दलवाई, नरेंद्र जाधव, सतिशचंद मेहता उपस्थित होते. स्क्रृटीनायझर अमृता नौटीयाल यांच्या उपस्थितीत ई-वोटिंग झाले. सुरवातीला गत सभेपासून या सभेपर्यंत दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
‘एआय’च्या वाढत्या उपयोगावर प्रकाश
यंदाच्या सभेत सभा पटलात सात विषय मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. त्यात कंपनीच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल, तांत्रिक नवकल्पना, भविष्यातील विक्री गुंतवणूक धोरणे तसेच सहव्यवस्थापकीय संचालकपदी अतुल जैन व डॉ. नरेंद्र जाधव यांची स्वतंत्र संचालकपदी पूणर्नियुक्तीसह ऑडिटर निर्णयांचा समावेश होता. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अर्थात ‘एआय’च्या वाढत्या उपयोगावर प्रकाश टाकला.
सभेत अनुभूती निवासी स्कुलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
यावर्षी केळीची चार हजार कोटी रूपयांची निर्यात झाली आहे. त्यात जैन इरिगेशनची टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून विकसित झालेली गुणवत्तापूर्ण केळीला जगात प्राधान्य आहे. विदेशातील मागणी पाहता टिश्यूकल्चर रोपांची मागणी वाढत आहे. त्यामुळेच टिश्यूकल्चर विभागाच्या विस्तारीकरणावर भर दिला जाणार आहे, असे सूतोवाचही अनिल जैन यांनी केले. अनुभूती निवासी स्कुलचे विद्यार्थ्यांनी सभेच्या कामकाज समजावे म्हणून सहभाग घेतला. सभेनंतर अनिल जैन यांनी त्यांच्यासोबत संवाद साधून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसरण केले. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.
सहकाऱ्यांच्यावतीने अशोक जैन यांचा हृद्य सत्कार
मुंबई येथील चक्रव्हिजन इंडिया फाउंडेशनतर्फे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन पीस अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. कृषीपूरक कार्याला अधोरेखित करत पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानिमित्त कंपनीतील सहकाऱ्यांच्यावतीने अशोक जैन यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.