Jain Brothers Celebrate : जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा

0
10

समाजबांधवांनी अनुभवला सौहार्द अन्‌ आत्मशुद्धीचा संदेश

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

येथील आर.सी. बाफना स्वाध्याय भवनात वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे सामूहिक क्षमापना दिन श्रद्धा भाव आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला खा. स्मिता वाघ, आ.राजू मामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संयम स्वर्ण साधिका श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तीनी डॉ. सुप्रभा म.सा. आदी ठाणा सहा यांच्या पावन सान्निध्यात आत्मोत्कर्ष चातुर्मास सुरू आहे. त्या अंतर्गत पर्वाधिराज पर्युषण पर्वाच्या समाप्ती पश्चात सामूहिक क्षमापना कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी समाजबांधवांनी एकमेकांची क्षमा मागून परस्पर सौहार्द आणि आत्मशुद्धीचा संदेश अनुभवला. याप्रसंगी प.पू. डॉ. उदितप्रभा, प.पू. डॉ. हेमप्रभा म.सा. यांनी विशेष धर्म संदेशात मौलीक संदेश दिला.

यावेळी व्यासपीठावर प.पू. डॉ. सुप्रभा, प.पू. डॉ. इमितप्रभा, प.पू. उन्नतीप्रभा आणि नीलेशप्रभा आदीठाणा सहा यांची उपस्थिती होती. प्रारंभी आत्मोत्कर्ष चातुर्मास समिती प्रमुख ताराबाई डाकलिया यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विजयराज कोटेचा, कस्तुरचंद बाफना, संघपती सेवादास दलिचंद जैन, माजी खा. ईश्वरलाल जैन यांनीही सर्वांची क्षमा याचना करत मनोगत व्यक्त केले.

आध्यात्मिक शुद्धतेच्या मूल्यांचा संदेश बळकट

यावेळी सात दिवसांचा उपवास पूर्ण करणाऱ्या केवळ सात वर्षीय संस्कारकुमार दीपक सिसोदियाचा सन्मान विशेष आकर्षण ठरले. त्याला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आर.सी. बाफना समूहाचे सुशील बाफना आणि आर.एल. ज्वेलर्सचे मनीष जैन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. चिमुकल्याच्या मनोबलाचे आणि कुटुंबातून मिळालेल्या संस्कारांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. कार्यक्रमाला जैन समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामूहिक क्षमापना उपक्रमाने जैन समाजात संयम, क्षमा आणि आध्यात्मिक शुद्धतेच्या मूल्यांचा संदेश अधिक बळकट झाल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here