साईमत, यावल : प्रतिनिधी
जळगाव पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील हतनूर पाटबंधारे विभागात कालवा परिसरातील झाडे बेकायदा अत्याधुनिक मशिनरीने तोडल्याची तक्रार प्राप्त झाल्याने तसेच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यावल पूर्व वन विभागाचे वन क्षेत्रपाल स्वप्निल फटांगरे यांनी जळगाव पाटबंधारे विभागातील यावलचे जे.ई. यांना ३५ हजार रुपयांचा, यांत्रिकी विभागातील मेकॅनिकल जे.ई.यांना १५ रुपयाचा आणि दोन्ही ऑपरेटर यांना प्रत्येकी २ हजार ४०० रुपयाचा असा ५४ हजार ८०० रुपयाचा दंड ठोकल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या वृत्तास यावल पूर्व वन विभागातून दुजोरा मिळाला आहे. वनविभागाच्या कारवाईमुळे मात्र संपूर्ण तापी पाटबंधारे विभागात तथा जळगाव पाटबंधारे विभागात मोठी खळबळ उडाली असली तरी यात खरे जबाबदार जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच हतनूर पाटबंधारे यावल शाखेचे उपविभागीय अभियंता यांच्यावर दंडात्मक कारवाई न झाल्याने याप्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
सविस्तर असे की, हतनूर धरणाचा पाट यावल, रावेर तालुक्यातून चोपडा तालुक्यात गेलेला आहे. या पाटाच्या आजूबाजूच्या परिसरातील १० ते १५ वयोगटाची झाडे हतनूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिना परवानगीने तसेच जेसीबी, पोकलेंड आदी अत्याधुनिक मशिनरीने तोडल्याने याबाबतची तक्रार नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ता नितीन रंधे यांनी १९ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित सर्व अधिकारी आणि विभागाकडे केली होती. दाखल तक्रारनुसार नागपूर येथील विभागीय वन अधिकारी (संरक्षण) अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (संरक्षण) यांनी चौकशी सुरू केली. त्याबाबतचे लेखी पत्र धुळे येथील वनसंरक्षक प्रादेशिक यांना प्राप्त झाले होते.
१९ डिसेंबर २०२३ रोजी यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते की, यांत्रिकी विभागीय पथक जळगाव कार्यालयामार्फत हतनूर कालवा परिसरात हतनूर धरण ते चोपडा कालवा म्हणजे रावेर ते चोपडा तालुक्यापर्यंत कालव्याच्या परिसरात असलेली झाडे अंदाजे दहा ते पंधरा वर्षे वयाची झाडे जेसीबी आणि पोकलेंड आदी अत्याधुनिक मशिनरीने काढली जात असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार नागपूर येथील विभागीय वन अधिकारी संरक्षण यांनी धुळे येथील वन संरक्षक प्रादेशिक यांना लेखी पत्र देऊन चौकशी करून चौकशी अहवाल अभिप्रायासह नागपूर कार्यालयास विना विलंब सादर करावा, असे आदेश वजा पत्र दिले होते.
कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह
यावल पूर्व वनविभागाचे वनक्षेत्रपाल स्वप्नील फटांगरे यांनी चौकशी करून अहवाल तयार करून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ५४ हजार ८०० रुपयांचा दंड ठोकल्याचे वृत्त आहे. परंतु एवढी मोठी कारवाई झाली असतानाही प्रसिद्धी माध्यमांना माहिती न मिळाल्याने तसेच त्यातील मुख्य जबाबदार जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि यावल शाखेचे उपविभागीय अभियंता यांच्यावर कारवाई न झाल्याने संपूर्ण तापी पाटबंधारे व जळगाव पाटबंधारे विभागात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.