साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील गोरखपूर तांडा (पिंपरखेड) येथे भर दिवसा घराचे कुलूप तोडून घरातून रोकड रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख २४ हजार २०० रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला शुक्रवारी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून काही तासातच चोरीचा उलगडा केला. त्यात मामाच्या घरी राहणाऱ्या व १२ वीत शिकणाऱ्या १७ वर्षीय भाच्यानेच आपल्या दोघा मित्रांच्या सहाय्याने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून प्रत्येकी १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस व प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या ५ सोन्याचा अंगठ्या असा ऐवज जप्त केला आहे. यात मुख्य सुत्रधार असलेल्या विधीसंघर्ष बालकास पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तसेच अन्य एक जण फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.
सविस्तर असे की, गोरखपूर(पिंपरखड) येथील निलेश सुभाष चव्हाण यांच्या घरातील लाकडी कपाटातील शोकेजमधील लॉकरमध्ये ठेवलेली ६४ हजार २०० रूपयांची रोकड व ८० हजार रूपये किंमतीच्या प्रत्येकी १०ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दोन नेकलेस आणि ८० हजार रूपये किमतीच्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या ५ अंगठ्या असा २ लाख २४ हजार २०० रूपयांचा ऐवज शुक्रवारी, २५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान चोरीस गेला होता. दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडून ही चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
भाच्यानेच केली करामत
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला निलेश चव्हाण यांनी जबरी चोरीची फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चोरीच्या घटनेची माहिती घेतली. चव्हाण यांच्या घरात कोण कोण राहतात, याची माहिती घेतांनाच पोलिसांनी आपला तपास निलेश चव्हाण यांच्या घरी राहणाऱ्या भाच्याच्या रोखाने वळविला. अन तिथेच चोरीचा उलगडा होवू शकतो, हे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी आपले कसब पणाला लावून मोबाईल, सीडीआर व गोपनीय माहितीच्या आधारे ऋषीकेश उमेश पवार (वय २२, करगाव तांडा क्रमांक १, ता. चाळीसगाव) याला चाळीसगाव शहरातील धुळे रस्त्यावरील राखुंडे मळ्यातून पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखविताच त्याने चोरी केलेले २ नेकलेस व ४ सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. हा ऐवज पोलिसांनी जप्त करून ऋषिकेश यास अटक केली. ही चोरी फिर्यादी चव्हाण यांचा भाचा याच्या मदतीने ऋषिकेश पवार व त्याचा साथीदार कल्पेश राठोड (रा. घोडेगाव) यांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
जबरी चोरीचा पोलिसांनी लावला छडा
याप्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश पवार यास अटक केली आहे तर कल्पेश राठोड हा फरार आहे. तसेच १७ वर्षीय विधीसंघर्ष बालकास हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. हा धाडसी चोरीचा उलगडा सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक्षक धरमसिंग सुंदरडे, हवालदार युवराज नाइक, पोना. गोवर्धन बोरसे, संदीप पाटील व निवृत्ती चित्ते यांनी केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच पोलिसांनी जबरी चोरीचा तपासाचा छडा लावल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे.
