बेंडाळे महाविद्यालयातील कृतज्ञता सन्मान सोहळ्यात प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शिक्षकाची सामाजिक बांधिलकी, शिक्षक- विद्यार्थी नातेसंबंध, शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती, संशोधन क्षेत्रातील विकास, मूल्यसंस्कार अशा विषयांवर चर्चा करून शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ आहे. आदर्श विद्यार्थी घडविणे शिक्षकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन लेवा एज्युकेशनल युनियनचे सचिव प्रा. व. पु. होले यांनी केले. डॉ. जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या (स्वायत्त) आय.क्यू.ए.सी.समितीतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसह शिक्षकेतर सहकाऱ्यांसाठी ‘कृतज्ञता सन्मान सोहळा’ आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील होते.
सोहळ्यासाठी सत्कारमूर्ती म्हणून प्रा. व. पु. होले, सहसचिव प्रा. एल. व्ही. बोरोले होते. प्रारंभी सरस्वती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, लेवा एज्युकेशनल युनियनचे संस्थापक डॉ. अण्णासाहेब बेंडाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.ऐश्वर्या परदेशी यांनी ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सादर केली. महाविद्यालयातील शिक्षकांसोबत शिक्षकेत्तर सहकारी यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन केले होते. याप्रसंगी जितू चिरमाडे , प्रा.डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डॉ. संजय रणखांबे, प्रा. राजेश कोष्टी यांनी प्रातिनिधीक मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य प्रा.डॉ. व्ही.जे.पाटील यांनी व्यक्त केले. तसेच प्रा.एल. व्ही.बोरोले यांनी गुरु-शिष्य महिमेचे वर्णन केले.
प्राध्यापकांसह प्राचार्य, उपप्राचार्य, कुलसचिव,
परीक्षा नियंत्रक, नॅक समन्वयकांचा सन्मान
सोहळ्यात शिक्षकेतर सहकारी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांसह प्राचार्य, उपप्राचार्य, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, नॅक समन्वयक आदींचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांनी काव्यमय शैलीत सोहळा आयोजनाची भूमिका मांडली. सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार तर आभार प्रा. नयना पाटील यांनी मानले.