सुरक्षितेसाठी पोलिसांची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे

0
23

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

सकारात्मक कामातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संदर्भातला लोकांचा विश्वास वाढेल, अशा प्रकारचे काम पोलीस प्रशासनाकडून झाले पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक ते सहकार्य लोकप्रतिनिधी म्हणून आपण द्यायला तयार आहोत. तसेच शहराच्या सुरक्षितेसाठी पोलिसांची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांनी केले.

पोलीस कवायत मैदान परिसरातील आणि आ.मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक निधीतून नूतनीकरण केलेल्या पोलीस आराम कक्षाचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आणि जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, चाळीसगाव पं.स.चे माजी सभापती संजय पाटील, ब्रिजेश पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, मेहुणबाऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड, सागर ढिकले, विशाल टकले, पीएसआय योगेश माळी, सुहास आव्हाड यांच्यासह शहर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, कोदगावचे ग्रामपंचायत सदस्य, बांधकाम व्यावसायिक भूषण पाटील आदी उपस्थित होते.

आराम कक्षाच्या नुतनीकरणासाठी १० लाखांचा निधी

आराम कक्षाच्या नुतनीकरणाचा प्रश्न पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्यासमोर ठेवला आणि आपण तात्काळ आराम कक्षाच्या नुतनीकरणासाठी १० लाख रूपयाचा निधी आपल्या आमदार निधीतून दिला, असे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले. शहराच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी कमी असल्याचा प्रश्न आपल्या कानावर घालण्यात आला. त्यादृष्टीनेही आपण प्रयत्न करणार असल्याचे आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस बळ अधिक मिळण्याच्या दृष्टीने सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस चौक्यांच्या नुतनीकरणाच्या कामास प्रारंभ

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते खरजई नाका आणि करगाव रोड या ठिकाणच्या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पोलीस चौक्यांच्या नुतनीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर सुरक्षित गाव म्हणून वाघडू गावालाही पोलीस अधीक्षकांनी आ.मंगेश चव्हाण यांच्या समवेत भेट दिली. वाघडू गावात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातले हे पहिले सुरक्षित गाव ठरले आहे. प्रास्ताविक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सुत्रसंचालन अमोल नानकर तर ए.पी.आय. सागर ढिकले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here