नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चांद्रयान यशस्वी झाल्यानंतर इस्रोकडून गगनयान मोहीमेची तयारीही सुरू आहे. भारताच्या मानवी अंतराळ मोहीमेला ‘गगनयान’ असं नाव देण्यात आलं आहे. गगनयान मोहिम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे.
गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहीमे अंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जातील. यासाठी त्यांचं प्रशिक्षणही सुरू आहे. येत्या काही महिन्यांत भारताचे सर्वात मोठे मिशन लाँच केलं जाऊ शकते. या मानवी अंतराळ मोहिमेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. गगनयान अंतराळ मोहिमेसाठी पहिले रोबोट तयार केले जात आहेत. आधी रोबोटिक चाचणी होईल त्यानंतर मानवाला अंतराळात पाठवलं जाईल. हे मिशन पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गगनयानच्या प्रत्यक्ष उड्डाण करण्यापूर्वी तीन चाचणी मोहिमा केल्या जातील. या तीन चाचणी मोहिमा मानवरहित असतील. इस्रोने ‘व्योमित्र’ नावाचा महिला रोबोट तयार केला असून तो चाचणीसाठी अवकाशात पाठवला जाईल. हा ‘हाफ-ह्युमनॉइड’ रोबोट अवकाशातून इस्रोला अहवाल पाठवेल. ‘व्योमित्र’ रोबोट अवकाशात पाठवला जाईल. रोबोट तेथील मानवाच्या सुरक्षेबाबत सर्व तपशील देईल.