चिंचपाडा शिवारातील गटाची चौकशी १५ ऑक्टोबरपर्यंत करा

0
18

साईमत, नवापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील चिंचपाडा शिवारातील नव्या शर्तीच्या जागेतून विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. जे.एम.म्हात्रे कंपनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी विना परवाना गौण खनिज उत्खनन करून दगड व मुरूम वापर करीत आहेत. त्यात शासनाचा महसूल बुडत आहे. कोणाच्या परवानगीने गौण खनिज उत्खनन केले जाते. गटाची चौकशी १५ ऑक्टोबरपर्यंत न केल्यास उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथे जनहित याचिका दाखल करावी लागेल, असे तक्रार वजा निवेदन मनीष ओमप्रकाश अग्रवाल यांनी दिले आहे. अशी तक्रार नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अप्पर जिल्हाधिकारी, गौण खनिज शाखा नंदुरबार, नवापूर तहसीलदार, चिंचपाडा (ता. नवापूर) मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, चिंचपाडा शिवारातील गट नंबर २२२/२, क्षेत्र ९ हेक्टर ६० आरमधून विना परवाना मुरुम व दगडाचे उत्खनन सुरू आहे. त्याची चौकशी होऊन कार्यवाही करावी. गट जुनी शर्त करु नये याबाबतचे निवेदन दिले आहे. चिंचपाडा शिवारात (गट नंबर २००/२) क्षेत्र ५ हेक्टर ८५ आर जमीन आहे. १३ सप्टेंबर ला माझ्या शेताची मोजमाप करत असतांना माझ्या गटाच्या मागील बाजुस जोरदार स्फोटाचा आवाज ऐकु आला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मॅनेजर व इतर दोन लोक आवाजाची चौकशी करण्याकामी पायी चालून मागच्या बाजुस गेलो. तेव्हा आम्हाला गट नंबर २२२/२ मध्ये दोन पोकलँड मशीन व चार डंपर दिसुन आले. आम्हाला बघून तेथे उभे असलेले फिरोज निजामुद्दीन तेली डंपर (रा. चिंचपाडा) हे पळू लागले. डंपर ड्रायव्हरही पळू लागले. ते पळू लागल्याने आम्हाला संशय निर्माण झाला. म्हणून हा प्रकार तहसीलदारांना कळविला. तहसीलदार महेश पवार बाहेरगावी असल्याने चिंचपाडा तलाठी व मंडळ अधिकारी यांना पाठवितो, असे तहसीलदारांनी आश्वासन दिले. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या मोजणीचे काम संपल्यानंतर मी घटनास्थळी येतो, असे तलाठी यांनी सांगितले. जागेवर जे.एम.म्हात्रे कंपनीचे जनरल मॅनेजर राजेश गंगाधर म्हात्रे, नवापूर पोलीस निरीक्षक व त्यांचे इतर कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दखल झाले.

राजेश म्हात्रे यांनी सांगितले की, ‘गौण खनिज उत्खनन करण्याकामी जिल्हाधिकारी मनिषा खत्री ज्यांनी परवानगी दिली आहे. आम्ही शासनाचे महसूल दंडासह भरणार आहोत. तुम्ही आमचे काम थांबवू शकत नाही. तुम्हाला कोणताही अधिकार नाही. आमची पोहच वरपर्यंत आहे. तुम्ही आमचे काहीही करु शकत नाही. जर तुम्ही आमची मुरुम उत्खननाबाबत कुठेही तक्रार केली तर आम्ही तुम्हाला पुन्हा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून टाकु’, असा दम दिला. चिंचपाडा येथील गट नंबर २२२/२ हा मायनिंग झोनमध्ये नाही. जे.एम.म्हात्रे कॉन्ट्रक्टर गौण उत्खनन कोणाच्या तोंडी परवानगीने करत आहेत. त्याची चौकशी करावी. गटाची मोजमाप पूर्ण होईपर्यंत प्रकल्प संचालक, धुळे यांना आदेश देण्यात यावे की, कॉन्ट्रक्टर शासनाच्या महसुलाची रक्कम भरत नाही. तोपर्यंत त्यांचे कोणतेही बिल अदा करु नये. गटाची एटीएस मशिनने तज्ज्ञ कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून मोजमापणी करावी. गटातून किती ब्रास दगड व मुरुमाचे उत्खनन केले त्याची चौकशी करुन महसुल रक्कम वसूल करावी.

संबंधितांना निवेदन रवाना

गट हे नवीन शर्तीचा आहे तरी शासनाच्या बिनशेतीचा नजराणा न भरत त्यांनी कोणाच्या परवानगीने उत्खनन केले, त्याची चौकशी करावी. गटाचे जुनी शर्त परवानगी देण्यापूर्वी आधीच्या अवैध उत्खननाचे मोजमाप करुन आधी त्यांचे दंड व इतर कर वसूल केल्यानंतर गट जुनी शर्ती करावी. गटामधून उत्खनन करण्याची परवानगी द्यावी. गटाची चौकशी १५ ऑक्टोबरपर्यंत न केल्यास उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे जनहित याचिका दाखल करावी लागेल. गटाची मोजणीकामी व इतर सर्व शासकीय खर्च मी करण्यास तयार आहे, अशा आशयाचे निवेदन मनिष ओमप्रकाश अग्रवाल यांनी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अप्पर जिल्हाधिकारी, गौण खनिज शाखा नंदुरबार, नवापूर तहसिलदार, चिंचपाडा (ता. नवापूर) मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडे दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here