साईमत : रावेर : प्रतिनिधी
काँग्रेसच्या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अपघातात झालेल्या मृत्यू बाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करत त्याचे कुटुंबियांस शासकीय मदत मिळावी याकरिता प्रहार जनशक्तीच्या वतीने पक्षाचे उत्तर महाराष्टाचे अध्यक्ष अनिल चौधरी याच्या नेतृत्वात रावेर तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना अनिल चौधरी, सुरेश चिंधू पाटील, सचिन महाजन, शुभम महाजन आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली काढण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रावेर- यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी व काँग्रेस पक्षाच्या वतीने दि.१२ सप्टेबर मंगळवार रोजी खिरोदा ते फैजपूर अशी रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीत आमदार शिरीष चौधरी यांच्या धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर च्या विद्यार्थ्यांना ही त्यांनी सहभागी करून घेतले होते. त्यात सहभागी विद्यार्थी भुवनेश दालुराम कुमावत हा सुद्धा सहभागी होता. त्यात त्याचा अपघाती मृत्यु होऊन घटना दुपारी १२.३० च्या दरम्यान होऊनही ०४.३० वाजता इतक्या उशिराने पोलिसांच्या माध्यमातून त्याचे घरी कळविण्यात आले.
तसेच या युवकाचा मृत्यू जागीच होऊन त्यास आयोजक जबाबदार असल्याची सर्वत्र चर्चा होत असून हळहळ व्यक्त केली जात आहे. तरी सदरच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून त्याचे कुटुंबियांस आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी प्रहार जनशक्तीच्या वतीने निवेदनद्वारे करण्यात आली आहे.