रमाई घरकुलासह विविध योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा

0
18

साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर ।

येथील न.पा.मार्फत शासनाच्या रमाई घरकुल योजनेसह विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे संजय उर्फ भाऊसाहेब सरदार यांच्यासह आदींनी निवेदन देऊन अर्धनग्न आंदोलन करत २४ जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेमार्फत मलकापूर रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आर.ओ. फिल्टर बसविण्यात आला होता. परंतु तो आर.ओ. फिल्टर आजपर्यंत सुरु केला नाही. या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. न.प. मलकापूरमार्फत दलीत मागासवर्गीय लोकांसाठी हक्काचे घर मिळावे, म्हणून न.प.मार्फत रमाई घरकुल योजना राबविण्यात येते. परंतु योजनेचा लाभ देतांना या विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे जातीय द्वेष भावनेतून लाभार्थ्यांचा छळ करून मानसिक त्रास देतात. तसेच ह्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. अश्‍या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी, न.प. मार्फत नळगंगा नदीवर मंगल गेट ते रमाई नगरला जोडणाऱ्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. या कामाची गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. नगर परिषदेमार्फत बांधकाम परवानगी घेतेवेळी जेवढी परवानगी घेतली जाते, त्यापेक्षा जास्त बांधकाम केले जाते तर काही ठिकाणी बांधकामाची परवानगी न घेता बांधकाम केले जाते. अशावेळी यामध्ये पैशांची देवाण-घेवाण करून शासनाचा महसूल बुडविला जातो. अशा कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर विदर्भ संघटक संजय सरदार, तालुकाध्यक्ष दिलीप इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन झनके, तुळशीराम गरूडे, दादाराव तायडे, बाबुराव निकम, राजू सरदार, अशोक इंगळे, शिवाजी बनकर, अशोक सरदार, विनोद सुरडकर, लहानु फुलपगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here