राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा धक्का; अजित-शरद गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेत
साईमत/मुंबई/प्रतिनिधी :
राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांना अपेक्षित यश मिळालेले नाही, ज्यामुळे पक्षाच्या भविष्यात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित करत बहुसंख्य ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद दाखवली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने सत्ता मिळवली आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही राष्ट्रवादीची पारंपरिक बालेकिल्ले मानली जात असतानाही भाजपाने मुसंडी मारत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गट स्वतंत्रपणे आणि काही ठिकाणी समन्वय साधून जोरदार प्रयत्न करत होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही गट एकत्र येऊन प्रचार केला, तर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे अजित पवार गटाच्या ‘घड्याळ’ चिन्हावर प्रचार करताना दिसून आल्या होत्या. मात्र, एवढ्या प्रयत्नांनंतरही अपेक्षित यश राष्ट्रवादीला मिळाले नाही.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादीला तब्बल ३९ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी अजित पवार गटाला केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागले, तर शरद पवार गटाला अवघ्या ३ जागा मिळाल्या. ही घसरण राष्ट्रवादीसाठी चिंतेची बाब ठरली आहे. विशेषतः शरद पवार यांच्या गटाला राज्यातील तब्बल १८ महापालिकांमध्ये खातेही उघडता आलेले नाही.
या पराभवामुळे दोन्ही गटांमध्ये आत्मपरीक्षण सुरू झाले असून, पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. पक्षांतर्गत चर्चा अशी आहे की, बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वतंत्रपणे लढण्यापेक्षा दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येणे पक्षाचे अस्तित्व आणि प्रभाव टिकवण्यासाठी आवश्यक ठरेल. शरद पवार यांच्या गटाकडून लवकरच मोठा निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा आणि एकत्रित भूमिका राज्यातील राजकारणाच्या नकाशावर मोठा प्रभाव टाकू शकते.
