मुंबई : प्रतिनिधी
नवसाला पावणारा आणि सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणपती अशी ख्याती असणाऱ्या लालबागचा राजाच्या मूर्तीची झलक नुकतीच सर्वांना पाहायला मिळाली. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या आधी काहीवेळासाठी लालबागचा राजाची मूर्ती सर्वांना दाखवण्यात आली. काहीवेळातच लालबागचा राजाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर एका गोष्टीमुळे वादंग निर्माण झाला आहे.लालबागचा राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आली आहे.ही बाब अनेकांना खटकली.त्यानंतर सकल मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्याकडून मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात लालबागचा राजा मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न मंडळाने केला, त्यांंचा या पाठीमागचा हेतू शिवअनुयायांना कळालेला नाही. या कृतीने लालबागचा राजा मंडळाने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. गणपती बाप्पा जरी देव असले तरी शिवाजी महाराजांमुळे ते देव्हाऱ्यात आहेत. त्यामुळे ही राजमुद्रा त्यांच्या पायावर असणे पटत नाही म्हणून या मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे.