वडगावसीमला नीळकंठेश्वर महादेवाची प्रतिष्ठापना

0
22

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील कोळंबा ग्रुप ग्रा.पं.अंतर्गत वडगावसीम येथील श्री हनुमान मंदिरात वर्षानुवर्षांपासून स्थापित श्री महादेवाची पिंड जीर्ण झाल्याने तेथे श्री ओंकारेश्वर जवळील बकावा (म.प्र.) येथून नवीन मूर्ती आणून श्री निळकंठेश्वर महादेवाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळींनी सढळ हस्ते देणगी देऊन मंदिर निर्माण कार्यास हातभार लावलेला आहे. पहिल्या दिवशी ग्रामसफाई करण्यात येऊन गावभर सडासमार्जन, रांगोळ्या, पताका, केळीचे खांब, ध्वज, तोरण लावून गावात सजावट करण्यात आली होती. श्रीरेणुका देवीच्या मंदिरापासून सुशोभित वाहनावर महादेवाच्या मुर्त्या ठेवून गावभर भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. सवाद्य मिरवणुकीत शेकडो कलशधारी मुली, महिला, आबालवृद्ध व तरुणांनी सहभाग घेतला.

दुसऱ्या दिवशी होमहवनासाठी २१ यजमान जोडपे बसविण्यात आलेले होते. पुरोहितांनी मंत्रोच्चारात विधिवत अभिषेक करून श्रीहनुमान मूर्ती व महादेव मूर्तीची स्थापना पूजा आरती केली. यावेळी गाव व पंचक्रोशीतील हज्जारों भाविक भक्तांनी महाप्रसाद भोजन भंडाऱ्याचा लाभ घेतला. रात्री कठोरा येथील भजन मंडळाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सर्वच सत्पात्री देणगीदारांचे आभार मानण्यात आले. बऱ्याच वर्षांपासून गावात असा कार्यक्रम झालेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण व एकोपा निर्माण झालेला दिसत होता. यशस्वीतेसाठी वडगावसीम येथील बालगोपाल, महिलामंडळ, तरूणवर्ग, वयोवृध्द व्यक्ती, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here