साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्ग टेकडी हा जलसंधारण व पर्यावरणीय प्रकल्प सामाजिक कार्यकर्ते जल व पर्यावरण मित्र सोमनाथ माळी यांचे संकल्पनेतून व सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण विभाग व लोकसहभागातून जवळपास पंचवीस हेक्टर क्षेत्रावर पंचवीस हजार झाडांचे गेल्या दोन वर्षापासून वृक्षारोपण होऊन संगोपन करण्यात येत आहे. हा परिसर चराईसाठी बंद केला आहे. झाडांबरोबरच गवत वाढीस येत असल्यामुळे जैवविविधता वाढीस येत आहे. वन्यप्राणी हरिण, ससे, कोल्हे, लांडगे, तसेच पक्षी मोर, तितर, घार, टिटवी, चिमणी आदी पक्षी वाढीस येत आहेत. हा परिसर अतिशय दुर्गम असल्याने याठिकाणी येणे जाणेही जिकरीचे आहे. परिसरातील शेतकऱ्यांना निसर्गमय ठिकाणी शांत वातावरणात धार्मिक स्थळ असावे या उद्देशाने जलमित्र परिवार चाळीसगावतर्फे श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी महादेवाच्या पिंडाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
याप्रसंगी विठ्ठल देसले, हरीचंद्र पवार, अंकुश पवार, सतीष डोखे, जलमित्र परिवार चाळीसगावचे शशांक अहिरे, कुणाल रुईकर, सोमनाथ माळी, विष्णू राठोड, विलास चव्हाण, ओम माळी तसेच निर्मला पवार, कल्पना चव्हाण, सीमा चव्हाण, संगिता दाभाडे, शितल पवार, पूर्वा दाभाडे यांच्यासह भक्त परिवार उपस्थित होते.