साईमत/ न्यूज नेटवर्क/ यावल :
शहरातील एकूण ८ रेशन दुकानदारांच्या दुकान तपासणीचा नमुना प्रत्यक्ष बघितल्यावर यावल पुरवठा विभागातील निरीक्षक अधिकारी अर्चना एस.भगत, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड आणि स्वस्त धान्य दुकानदार यांचा अनुक्रमे तपासणी व कार्यवाही अहवाल म्हणजे ‘चोर पोलिसांचा खेळ’ झाला आहे. आजही अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये त्रुटी राहिल्या असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. कारवाई झाल्यानंतर पुढे काय ? स्वस्त धान्य दुकानदार पुरवठा विभागाच्या नियमानुसार आणि प्रमाणानुसार ग्राहकांना धान्य वितरित करीत आहेत का..? असा प्रश्न तालुक्यात उपस्थित केला जात आहे.
शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता प्रवीण डांबरे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे गेल्या २८ फेब्रुवारी २०२४ रोजी माहितीचा अर्ज देऊन यावल शहरातील स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करून अर्ज मासिक दैनंदिनी सोबत सादर केलेला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या कारणे दाखवा नोटीसीची संपूर्ण माहिती मिळावी, असा अर्ज दिलेला होता. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार यावल शहरातील स्वस्त धान्य दुकानांपैकी ७ ते ८ रेशन दुकानदारांची तपासणी यावल पुरवठा कार्यालयातील निरीक्षण अधिकारी अर्चना एस.भगत यांनी केली होती.तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविल्यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस देऊन कार्यवाही केली आहे. परंतु ही कार्यवाही म्हणजे ‘चोर पोलिसांचा खेळ’ झाला असल्याचे संपूर्ण यावल शहर असेल तालुक्यात बोलले जात आहे.
ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी अन् संताप
यावल शहरातील यावल सहकारी ग्राहक भांडाराचे सेल्समन तथा स्वस्त धान्य दुकानदार केशव प्रल्हाद बढे, आसिफ खान ताहेर खान, शोभाबाई अशोक बडगुजर, साजिदाबी मुश्ताक, अशपाक अहमद मुशिर खान, नायगाव येथील जितेंद्र भगवान बोरसे यांना पुरवठा अधिकारी, जळगाव यांनी कारणे दाखवा नोटीस दिली. पुढील कार्यवाही केली असली तरी अद्यापही अनेक स्वस्त धान्य दुकानदार स्वस्त धान्य वाटपाचे अटी-शर्तीचे नियमाचे पालन करीत आहेत का? ग्राहकांना कॅश मेमो देत आहेत का? ग्राहकांना ठरल्याप्रमाणे योग्य मापात दर महिन्याला धान्य दिले जाते का? आदी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत यावल पुरवठा विभागाकडे अनेक लेखी तोंडी तक्रारी असताना कार्यवाही मात्र शून्य होत असल्याने स्वस्त धान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पुरवठा विभागात शेकडो ग्राहकांची गर्दी
पुरवठा विभागात नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी, रेशन कार्डवरील नाव कमी करणे, नवीन नावाची नोंदणी करणे, कार्ड अपडेट करून नंबर नोंद करणे आदी कामांसाठी शेकडो ग्राहकांची गर्दी पुरवठा विभागात होत आहे. ही कामे करून देण्यासाठी वेगवेगळ्या कामाचे वेगवेगळे दर पुरवठा विभागाच्या नावावर तसेच स्वस्त धान्य दुकान तपासणीची ठरलेली रक्कम दरमहा कोणीतरी मध्यस्थी संबंधित अनेक दुकानदारांकडून वसूल करून मोठी आर्थिक कमाई करून घेत असल्याचे ग्राहकांमध्ये चर्चिले जात आहे. याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी, यावल तहसीलदार यांनी लक्ष केंद्रित करून पुरवठा विभागातील निरीक्षक अधिकाऱ्यांकडून नागरिकांची कामे वेळेवर कशी होतील, याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.