राज्यस्तरीय कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातून डॉ. जगदीश पाटील यांचा सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी एकविसाव्या शतकातील कौशल्यांची रूजवणूक व्हावी, म्हणून स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात प्रथमच हॅकेथॉन उपक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी १५ विषयांवर आधारित प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विचार करावा, असा उपक्रमाचा उद्देश आहे. ‘हॅकेथॉन’ उपक्रमाची सक्षमपणे कार्यवाही होऊन प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे नुकतीच राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. त्यात बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातून सहभागी झाले होते.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि शाश्वत विकासाची ध्येये यानुसार विद्यार्थ्यांनी १५ विषयांवर आधारित प्रतिकृती तयार करण्यासाठी ‘हॅकेथॉन’ हा उपक्रम आयोजित केला आहे. त्यात आरोग्य, कृषी, वाहतूक व दळणवळण, दर्जेदार शिक्षण, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरी विकास रचना, पर्यटन, संगणकीय विचार, स्वच्छता, अन्न आणि पोषण, परवडणारी व स्वच्छ ऊर्जा, लिंग समभाव, सांस्कृतिक वारसा, प्रदूषण व डिजिटल सुरक्षा अशा १५ विषयांचा समावेश आहे.
‘हॅकेथॉन’ उपक्रमात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित व शासकीय शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. दोन विद्यार्थी व एक मार्गदर्शक शिक्षक याप्रमाणे एक टीम अशा अनेक टीम ‘हॅकेथॉन’ उपक्रमात सहभागी होऊ शकतील. प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक हजार नोंदणी होणे अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यात हॅकेथॉन उपक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली हॅकेथॉन जिल्हा समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रतिभा भावसार, सहसमन्वयक डॉ. जगदीश पाटील कार्यरत आहेत.
कौशल्यांची रूजवणूक होण्यासाठी उपक्रम
नवनिर्मितीचा विचार विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी एकविसाव्या शतकातील कौशल्यांची रूजवणूक व्हावी, यासाठी ‘हॅकेथॉन’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. चिकित्सक विचार, सर्जनशीलता, सहयोग व संवाद अशी एकविसाव्या शतकाची चार कौशल्ये आहे. त्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेली आत्मविश्वास व करूणा अशी दोन कौशल्ये जोडलेली आहेत.
– डॉ. अनिल झोपे,
प्राचार्य, डाएट, जळगाव