देशात इंदूर सलग सातव्यांदा सर्वात स्वच्छ शहर

0
25

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

इंदूरने सलग सातव्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला तर सुरत पहिल्यांदाच अव्वल क्रमांकासाठी संयुक्त विजेता ठरला. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांची क्रमवारी जाहीर झाली आहे. हिऱ्यांचे शहर अशी ओळख असलेले गुजरातमधील सुरत २०२० पासून द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरत होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून नवी मुंबईने तिसरा क्रमांक राखला आहे तर पुण्याने पुन्हा टॉप टेनमध्ये पुनरागमन केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जाहीर केलेल्या २०२३ च्या स्वच्छ शहर निकालानुसार, महाराष्ट्रातील सासवडला एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. छत्तीसगडमधील पाटण आणि महाराष्ट्रातील लोणावळा या शहरांनी या यादीत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.
कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट क्षेत्राचा पुरस्कार मिळाला तर गंगा शहरांमध्ये वाराणसीला सर्वेोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही राज्यं सर्वात स्वच्छ ठरली आहेत.
नागरी स्वच्छता सर्वेक्षणाच्या आठव्या वर्षाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. हे जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण असल्याचा सरकारचा दावा आहे.२०१६ मध्ये सुरू झालेल्या सर्वेक्षणात सुरुवातीला फक्त ७३ प्रमुख शहरांचा समावेश होता आणि २०२३ मध्ये ही संख्या ४४७७ वर गेली आहे.

सर्वात स्वच्छ शहरे २०२३
(एक लाखाहून अधिक लोकसंख्या)
१. इंदूर आणि सुरत, ३. नवी मुंबई,
४. विशाखापट्टणम, ५. भोपाळ,
६. विजयवाडा, ७. नवी दिल्ली,
८. तिरुपती. ९. हैद्राबाद
१०. पुणे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here