साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी महाकाव्यांमध्ये वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी झाली, ही भारतीय संशोधन जगताविषयी अभिमानाची बाब आहे. भारताचे संशोधन, वेगवेगळे आविष्कार जगमान्य झालेले आहेत. भारताचे संशोधन क्षेत्रातील महत्त्व विशेष अधोरेखित करण्यासारखे आहे. त्यामुळे भारतीय संशोधनाची परंपरा अतिप्राचीन आणि संपन्न आहे, असे प्रतिपादन राजेंद्र नन्नवरे (राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य, क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव) यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स अँड के.के.सी.कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हास्तरीय आविष्कार २०२३-२४ स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. सी. पाटील (अध्यक्ष, चा.ए.सोसायटी) यांनी विज्ञान-तंत्रज्ञानातील विविध संशोधनाची माहिती देऊन संशोधनामुळे झालेला मानवी विकासाविषयी मत मांडले. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी विविध शास्त्रज्ञांचे दाखलेही त्यांनी दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व कळावे, त्यांना संशोधना करीता प्रोत्साहित करण्यासाठी तसेच संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापक यांना आपल्या संशोधनाचे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेत कला, साहित्य, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी, विज्ञान, कृषी, पशुवैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अशा विविध विषयांमधील संशोधनपर पोस्टरसह मॉडेल सादर केले.
४७४ संघाकडून पोस्टर अन् मॉडेलचे सादरीकरण
आविष्कार स्पर्धेत १ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक सहभागी झाले होते. स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थी, संशोधकांनी विविध विषयातील संशोधन प्रदर्शनात पोस्टर आणि मॉडेल प्रकारातून ४७४ टीमने सादरीकरण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी मनोगतात प्रमुख पाहुणे, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य, संशोधक यांना महाविद्यालय व संस्थेबद्दल माहिती करून दिली. स्पर्धांमध्ये ५८१ संघांनी नोंद केली होती. त्यापैकी ४७४ संघांनी पोस्टर आणि मॉडेल प्रकारातून सहभाग नोंदविला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमोल पाटील, चा.ए.सो.चे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ.विनोद कोतकर, सीनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश स्वार, ज्युनिअर कॉलेज कमिटीचे चेअरमन नाना कुमावत, संस्थेचे संचालक ॲड. प्रदीप अहिरराव, उद्योजक योगेश अग्रवाल, मु.रा.अमृतकर, निलेश छोरिया, जितेंद्र वाणी, योगेश करंकाळ, रवींद्र राजपूत, मे.हू.बुंदेलखंडी, उद्योजक अशोक पटेल, प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, सिनेट सदस्य मीनाक्षी निकम, प्रा. सुनील निकम, विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एस. दलाल, स्पर्धा समन्वयक प्रा. विभा पाटील, सहसमन्वयक डॉ. जामतसिंग राजपूत, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, उपप्राचार्य प्रा.डी.एल.वसईकर, उपप्राचार्या डॉ. कला खापर्डे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी विविध महाविद्यालयीन समित्या, सर्व कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक स्पर्धा समन्वयक प्रा. विभा पाटील यांनी केले.