‘केसीई’च्या अध्यक्षांकडून पाच हजाराचा विशेष पुरस्कार जाहीर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे याने नुकत्याच पार पडलेल्या भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाड २०२५ मध्ये देशातून द्वितीय क्रमांक मिळवून जळगावसह संस्थेचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. अशा उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी ‘आयुष’ला प्रोत्साहनपर पाच हजार रुपयाचा विशेष पुरस्कार जाहीर करून त्याचा गौरव केला. जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील हा यशाचा झेंडा केसीई संस्थेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तावर्धन प्रयत्नांसह विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला अधोरेखित करणारा ठरला आहे.
नवी दिल्लीतील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्रथमच राष्ट्रीय स्तरावर आयोजित स्पर्धेत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वेद, उपनिषद, भारतीय शास्त्र, गणित आणि सांस्कृतिक परंपरा विषयांवरील आव्हानात्मक प्रश्नपत्रिकेत आयुषने १०० पैकी १०० गुण मिळवत आपली अभ्यासू वृत्ती आणि विषयाची सखोल समज सिद्ध केली. जयपूर येथे नुकत्याच झालेल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात आयुषचा राष्ट्रीय विजेत्या म्हणून गौरव करण्यात आला. सोहळ्यात त्याला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपयाचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
आयुष भामरेने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे. संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरेसारख्या विषयात आजच्या तरुणांकडून एवढ्या उत्कटतेने सहभाग होत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि प्रेरणादायी बाब आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच केसीईच्यावतीने त्याला पाच हजार रुपयाचा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी सांगितले. आयुषचे यश संस्थेतील संस्कृत अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरेल. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा गौरव जागतिक स्तरावर नेण्यासाठी आमचे विद्यार्थी कटिबद्ध असल्याचे प्राचार्य डॉ. भारंबे यांनी सांगितले.
‘आयुष’वर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय हे केवळ विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे तर भारतीय संस्कृती आणि परंपरांच्या संवर्धनातही अग्रस्थानी आहे. आयुषसारख्या विद्यार्थ्यांमुळे संस्कृत विषयाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा. आर.बी. ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील, संस्कृताध्यापक प्रा. अर्जुनशास्त्री मेटे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी ‘आयुष’वर कौतुकाचा वर्षाव केला आहे.