India Iiquor : दारू सेवनात भारत जागतिक क्रमांकावर ; आर्थिक समृद्धी की सामाजिक चिंता?

0
8

एका भारतीयाने वर्षभरात सरासरी ३.०९ लिटर दारूचे सेवन — देशाला तब्बल ५.६३ लाख कोटींचा महसूल

साईमत प्रतिनिधी

दारूचे सेवन ही फक्त सवय किंवा संस्कृतीचा भाग नसून ती अनेक देशांसाठी मोठा आर्थिक स्रोत ठरली आहे. जगभरातील बहुतांश देशांमध्ये मद्य उत्पादन, विक्री आणि व्यापार प्रचंड प्रमाणात केला जातो. मात्र, या क्षेत्रातून सर्वाधिक पैसा कमावणारा देश म्हणून चीनने जगात अव्वल स्थान पटकावले आहे.

चीनचा ‘दारू अर्थव्यवस्थे’चा चमत्कार
ग्रँड व्ह्यू रिसर्चच्या अहवालानुसार, चीनने २०१८ मध्ये मद्यविक्रीतून तब्बल २३.७ लाख कोटी रुपयांची कमाई केली. इन्फोग्रामच्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये चीनने विशेषतः बिअर विक्रीतून सर्वाधिक महसूल मिळवला.
तज्ज्ञांच्या मते, २०३० पर्यंत चीनचा अल्कोहोलिक ड्रिंक्स मार्केट १९.१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल आणि २०२५ ते २०३० दरम्यान या क्षेत्राचा वार्षिक वाढीचा दर १०.१ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चीनमधील शहरीकरणाचा वेग, जीवनशैलीतील बदल आणि प्रीमियम पेयांची वाढती पसंती हे या वृद्धीमागचे प्रमुख घटक आहेत. मार्केटिंग टू चायना या संकेतस्थळानुसार, पूर्वी ‘बायज्यू’ या पारंपारिक दारूवर भर देणारे चिनी लोक आता वाइन, स्पिरिट्स आणि हार्ड सेल्टझर या आधुनिक पेयांकडे वळत आहेत. यामुळे केवळ काही वर्षांत वाइन महसूलात ४५.१५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन विक्रीचा जलद विस्तार
चीनमध्ये आता ५५ टक्के लोक ऑनलाईन दारू ऑर्डर करतात, असे अहवालात नमूद केले आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाद्वारे प्रीमियम वाइन, क्राफ्ट बिअर आणि सेल्टझर ड्रिंक्सची मागणी झपाट्याने वाढत आहे.
डिजिटल मार्केटिंगमुळे या उद्योगाने केवळ शहरीच नव्हे, तर उपनगर आणि छोट्या शहरांतही बाजारपेठ विस्तारली आहे.

भारताचा ‘दारू महसूल’ आणि सेवनाचा आकडा
चीनप्रमाणेच भारतातही दारूचे सेवन मोठ्या प्रमाणात होते. सीआयए वर्ल्ड फॅक्टबुकच्या माहितीनुसार, भारतात १५ वर्षांवरील नागरिक सरासरी ३.०९ लिटर अल्कोहोल दरवर्षी पितात. चीनमध्ये हा आकडा ४.४८ लिटर तर अमेरिकेत ८.९३ लिटर इतका आहे.

दारूच्या विक्रीतून भारत सरकारला मिळणारा महसूलही लक्षणीय आहे. भारताने दारू विक्रीतून तब्बल ५.६३ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. राज्य सरकारांसाठीही हा महसूल हा कर संकलनातील सर्वात मोठ्या स्रोतांपैकी एक मानला जातो.

दारू — आरोग्यापेक्षा अर्थव्यवस्थेचा विषय?
दारू सेवनावर वैद्यकीय व सामाजिक स्तरावर टीका होत असली तरी, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ती एक ‘महसूलनिर्मितीची शक्ती’ ठरली आहे. चीनने या क्षेत्राला औद्योगिक व तांत्रिक दृष्ट्या आधुनिक करून महसूलात आघाडी घेतली आहे, तर भारतासह इतर देशही या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहेत.

दारू ही केवळ पेय नसून, ती आता जगातील अर्थकारणाचा एक मोठा आधारस्तंभ ठरली आहे. चीनने ‘दारू अर्थव्यवस्था’चे मॉडेल उभे करून जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. भारतातही या क्षेत्रातून मिळणारा महसूल सरकारच्या तिजोरीत मोठा वाटा उचलतो, मात्र त्याचवेळी सामाजिक आणि आरोग्यविषयक परिणामांवर लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here