साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जी २० शिखर परिषदेला शनिवारी (९ सप्टेंबर) देशाच्या राजधानीत सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन दिवसीय परिषदेसाठी जोरदार तयारी करण्यात येत होती. जगभरातील अनेक नेते, या परिषदेसाठी भारतात आल्याने त्यांच्या योग्य पाहुणचारासाठी भारताने खबरदारी घेतली आहे. दरम्यान, शिखर परिषदेला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कारण, या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरील नामफलकावर भारत असा उल्लेख आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या अनेक दस्ताऐवजातून इंडिया नाव वगळून त्यात भारत असे नाव जाणीवपूर्वक लिहिले जात आहे. जी २० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यानंतर, अनेक महत्त्वाची कागदपत्र, सरकारी पुस्तिकेतही इंडियाचं भारत असे नामकरण करण्यात आले आहे. आताही शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामफलकावर भारत असा उल्लेख आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये ‘भारत’ दाखवणारे फलक स्पष्ट दिसत आहे.