मलेशियाला धूळ चारत भारताने चौथ्यांदा पटकावली ट्रॉफी

0
2

चेन्नई : वृत्तसंस्था

भारतीय संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे.अंतिम सामन्यात भारताने एका टप्प्यावर दोन गोलने पिछाडीवर असताना मलेशियाचा ४-२ असा पराभव केला. उत्तरार्धापर्यंत मलेशियाचा संघ ३-१ असा आघाडीवर होता. भारताने चौथ्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियनशीपचे विजेतेपद पटकावले आहे. भारत ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानच्या नावावर ३ किताब आहेत.
भारताकडून जुगलराज सिंह (१९ व्या मिनिटाला),हरमनप्रित सिंह (४५ व्या मिनिटाला),गुरजंत सिंह(४५व्या मिनिटाला)आणि आकाशदीप सिंह(५६ व्या मिनिटाला)यांनी गोल डागले तर तिकडे मिलेशियासाठी अजराई अबू कमाल, रजी रहीम आणि एम. अमीनुद्दीन यांनी गोल केले.
या अंतिम मुकाबल्यात गोलची सुरुवात भारताकडून झाली. खेळाच्या ९ व्या मिनिटाला जुगलराज सिंह यांनी पेनल्टी कॉर्नरवर एक उत्कृष्ट गोल केला.त्यानंतर खेळाच्या १४ व्या मिनिटाला अजराई अबू कमाल याने फील्ड गोल करत स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. मग खेळाच्या दुसरा क्वार्टर पूर्णपणे मलेशियाच्या नावे झाला. यात पाहुण्या संघाने दोन गोल केले.
त्यानंतर १८ व्या मिनिटाला अनुभवी खेळाडू असलेल्या रजी रहीम याने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल डागला. पुढे २८ व्या मिनिटाला मोहम्मद अमीनुद्दीन याने देखील पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. विशेष म्हणजे हाफटाइमपर्यंत मलेशिया ३-१ ने पुढे होता.
भारताचे शानदार पुनरागमन
त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. या क्वार्टरमध्ये शेवटच्या मिनिटात भारताने दोन गोल केले. सर्वप्रथम कर्णधार हरमनप्रीत सिंह याने पेनल्टी स्ट्रोकवर दमदार गोल केला. नंतर काही सेकंदांतच गुरजंत सिंहने फील्ड गोल डागत मुकाबला बरोबरीत आणला. नंतर शेवटच्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंह याने भारतासाठी निर्णायक गोल डागला.भारताने ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकत पाकिस्तानला मागे सारले आहे.भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त केवळ कोरियाच ही स्पर्धा जिंकू शकलेला आहे. कोरियाने सन २०२१ साली हा किताब जिंकला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here