नंदुरबारसाठी तापी नदीतून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना; ना.डॉ. विजयकुमार गावित

0
17

साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबार शहर व परिसरातील खेड्यांमधील वाढते शहरीकरण, लोकसंख्या व गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे नंदुरबार शहर, आसपासच्या ग्रामीण क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणी पातळीत सातत्याने घट होत असल्याने, नंदुरबार शहरासाठी तापी नदीवरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वर्षभरात या योजनेला मंजूरी घेऊन नंदुरबारवासीयांना बारमाही, 24 तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती, राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
ते या संदर्भात नंदुरबार शासकीय विश्रामगृहात बोलत होते. याव्ोळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. याव्ोळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, यंदा पर्जन्यमान कमी असून नंदुरबार शहराला व आसपासच्या ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्याऱ्या स्रोतांमध्ये व प्रामुख्याने विरचक धरणात जलसाठा अतिशय कमी आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षात शहराला एक किंवा दोन दिवसाआड पाणी पुरवठा होताना दिसतो.

शहराची वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर शहरानजीकच्या ग्रामीण भागाचे मोठ्या प्रमाणावर होणारे नागरीकरण त्यामुळे एकट्या विरचक धरणावर येणाऱ्या काळात अवलंबून राहता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांना तापी नदीवरून नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा आराखडा तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या वर्षाच्या आत या योजनेला शासनाची मंजूरी घेवून, नंदुरबार शहराचा पाणी प्रश्‍न शाश्‍वत स्वरूपात सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी याव्ोळी सांगितले. जिल्ह्यात झालेल्या अल्प पावसामुळे टंचाईसदृश्‍य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा विभाग, कृषि, पशुसंवर्धन, पाटबंधारे विभाग यांना पेयजलाची परिस्थिती, गरजेचा अंदाज घेवून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच टंचाईचा अंदाज घेऊन रोजगार हमीची कामे सुरू करण्याचेही नियोजन करण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री डॉ. गावित यांनी याव्ोळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here