बोदवड तालुक्यातील राजूर गावातील घटना
साईमत/बोदवड/प्रतिनिधी
मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
बोदवड-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विनोद सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृती मारोती मंदिरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यानंतर त्याचा प्रचार दौर बोदवड तालुक्यात सुरू झाला. बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात कुणालाही दुखापत झालेले नाही. दरम्यान, याबाबत अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधल्यावर त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.