परिवर्तन महाशक्ति सोबत चर्चा करुन उमेदवारांचे नाव प्रसिद्ध करणार
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
बुलढाणा येथे शेतकरी संघटना समर्पित स्वतंत्र भारत पक्षाची जिल्हा कोअर कमेटीची आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत परिवर्तन महाशक्ति नेतृत्त्वाकडे स्वतंत्र भारत पक्ष बुलढाणा जिल्ह्याच्या चार जागा निवडणूक लढण्यासाठी मागणार आहे. त्यात मलकापूर, सिंदखेडराजा, चिखली आणि बुलढाणा या जागेचा समावेश आहे. चारही जागांवर लढण्यासाठी लवकरच परिवर्तन महाशक्ति सोबत चर्चा करुन उमेदवारांचे नाव प्रसिद्ध करण्यात येतील.
परिवर्तन महाशक्तिचे सामूहिक नेतृत्व स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजी राजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी, प्रहार संघटनेचे बच्चु कडु, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे शंकर धोंडगे आणि भारतीय किसान जवान पक्षाचे नारायण अंकुशे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात यंदा शेतकऱ्यांचे सरकार निवडून आणु, असे सांगितले. बैठकीला बुलढाणा जिल्हा प्रमुख दामोदर शर्मा, घाटाखालचे व घाटावरील जिल्हा प्रमुख देवीदास कणखर, वामनराव जाधव, एकनाथ थुट्टे, बद्रीनाथ बुधवत, नामदेवराव जाधव, तेजराव मुंढे, बुलढाणा युवा आघाडी जिल्हा प्रमुख रणजीत डोसे आदी उपस्थित होते.