साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु. येथील ग्रामस्थांच्यावतीने बसथांब्याजवळ खुल्या व्यासपीठावर बुधवारी, १ नोव्हेंबर रोजी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. याप्रसंगी ‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष’ ‘एक मराठा-लाख मराठा’च्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी तालुक्यातील अनेक मराठा संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खडकीचे पोलीस पाटील तथा समाजसेवक विनायक मांडोळे यांनी मराठा समाजाची सद्यस्थिती व आरक्षणाची गरज यावर बोलत असताना सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये, सगळे मराठे हे कुणबीच आहेत. म्हणून मराठा समाजाचा कुणबी म्हणून ओबीसीत समावेश करावा, अशी आग्रही मागणी केली. गावातील सर्व संस्था, व इतर समाजाच्या संघटनांनीही साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी व्यासपीठावर चाळीसगाव सकल मराठा समाजाचे गणेश पवार, प्रमोद पाटील, खुशाल बिडे, दिनेश पाटील, कैलास सूर्यवंशी, अरुण पाटील, संजय कापसे, गावातील ग्रामस्थ सुजित गायकवाड, अर्जुन लोहके, मनाजी तांबे, भगवान शिंदे, सुदाम डोखे, ज्ञानेश्वर कोल्हे, विठ्ठल सावंत, गोकुळ कोल्हे, योगेश पठाडे, राहुल शिंदे, प्रल्हाद सावंत, सचिन ठूबे, बापु डोखे, मोतीलाल मांडोळे, रामभाऊ मांडोळे, अनिल कोल्हे, विकास जगताप, नाना तांबे, दत्तु गुंजाळ, भूषण कोल्हे, सतीश डोखे यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.