बँकेतील नोकर भरतीबाबतही महत्त्वाची चर्चा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीपेठमधील इमारत (दगडी बँक) विक्रीस बँकेच्या काही संचालकांनी विरोध दर्शविला आहे. बँकेतील नोकर भरतीबाबतही महत्त्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या संचालक मंडळाची सभा जळगाव येथे बँकेच्या सभागृहात बुधवारी, १ ऑक्टोंबर रोजी झाली.
संचालक मंडळाच्या सभेत विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक २१ हा बँकेच्या जळगावमधील नवी पेठेतील जीर्ण झालेल्या वास्तू विक्री संबंधात होता. तथापि, इमारत जागेची गव्हर्मेंट रजिस्टर व्हॅल्यूवरकडून आलेल्या व्हॅल्युएशन रिपोर्टबाबत समाधान न झाल्याने काही संचालकांनी मूळ विषयाला विरोध दर्शविला. यापूर्वी बँकेचे संचालक आ. एकनाथराव खडसे यांनी कालच याविषयी आपला विरोध दर्शविला होता तर आज बँकेचे संचालक प्रदीप देशमुख, संचालक, आ.अमोल पाटील यांनीही आपला विरोध नोंदविला. त्यामुळे या विषयावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बँकेतील नोकर भरतीचा विषयही चर्चेला आला. त्यात थेट सरळ भरतीचा पर्याय एक-दोन संचालकांनी सुचविला तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरतीबाबत आणि संचालकांनी असहमती दर्शविल्याचेही सांगण्यात आले.