विधानसभा निवडणुकीनंतर ४५ हजारांवर मतदारांची भर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यात मे २०२४ तसेच ऑक्टोबर दरम्यान लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यात गेल्या दहा ते अकरा महिन्यांच्या कालावधीत सद्यस्थितीत तब्बल ४५ हजार मतदारांची भर पडली आहे. त्यात महिला नवमतदारांच्या नोंदणीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोदवड वगळता जिल्ह्यातील १८ पालिकांसाठी संभाव्य प्रभागांची हद्द तपासणीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
पालिका प्रशासनाने ही मोहीम गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशे तयार झाल्यानंतर हाती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, गण-गट, नगरपरिषदांचा प्रभागनिहाय हद्द तपासणी पूर्ण झाल्यानंतर १८ ते २९ जुलैदरम्यान स्थानिक समितीकडून प्रारुप प्रभाग रचनेचा मसुदा तयार केला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात १९ नगरपरिषद, नगरपालिका आहेत. त्यात १८ पालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. बोदवड नगरपंचायतीचा कालावधी येत्या २०२६ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानुसार बोदवड नगरपंचायत वगळता स्थानिक स्तरावर हरकती मागविण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
लिंग गुणोत्तराचे प्रमाण ९४७ वरून झाले ९५४
जिल्ह्यात पुरूष मतदारांपेक्षा महिला मतदारांच्या तालुकानिहाय मतदार नोंदणी संख्येत २८ हजारांनी भर पडली आहे. गेल्या २०२४ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ३० ऑक्टोबर २०२४ रोजी १८ लाख ८८ हजार ९८९ पुरुष, १७ लाख ८८ हजार ९७९ महिला आणि १४४ तृतीयंपथी असे ३६ लाख ७८ हजार ११२ मतदारांची नोंद होती. सद्यस्थितीत १ जुलै २०२५ रोजीच्या मतदार नोंदणीनुसार १९ लाख ५ हजार ५१९ पुरुष तर १८ लाख १७ हजार २०५ महिला आणि १५३ तृतीयपंथी अशी ३७ लाख २२ हजार ८७७ मतदारांची नोंद झाली आहे. त्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये असलेले लिंग गुणोत्तराचे प्रमाण ९४७ वरून ९५४ झाले असल्याचे दिसून येते.