कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी देण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
तालुक्यातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या घोडगाव आऊट पोस्ट पोलीस चौकीचे जिल्हा नियोजन निधी २०२३/२४ अखेर प्राप्त निधीमधून बांधकाम केलेल्या घोडगाव आऊट पोस्ट पोलीस चौकीचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. घोडगाव आऊट पोस्ट पोलीस चौकीस कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आगामी काळात होऊ घातलेल्या गणेश उत्सव, दुर्गा उत्सव व सर्व सणांच्या शुभेच्छा देऊन सर्व सण आनंदासह शांततेने साजरे करण्याचे आवाहन करून गृहखात्यास सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी डीवायएसपी कुणाल सोनवणे, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पी.आय.कावेरी कमलाकर, सरपंच इंदुबाई भील, राजू महाजन, सुनील कोळी बीट हवालदार पोलीस पाटील छगन पारधी यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
पीआय कावेरी कमलाकर यांनी मनोगतात गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून पोलीस चौकीचे कंपाउंड व जागेचा भराव करण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच संतोष कोळी, मान्यवर दिलीप कोळी, युवराज रजाळे, सुनील पाटील, महेश पाटील, पंकज पाटील, गौतम शिरसाठ, महिला बचत गटाच्या असंख्य महिला, परिसरातील सर्वच पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य किशोर दुसाने यांनी केले.