बोदवडला स्वातंत्र्य दिनी अग्निशामक बंबचे लोकार्पण

0
30

बोदवड : प्रतिनिधी

शहरातील गांधी चौक येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सुरुवातीला आ.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अग्निशामक बंब, ट्रॅक्टर व दोन घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर माजी सैनिक, सफाई कर्मचारी २३ पुरुष, १६ महिला व घनकचरा कंत्राटदार यांच्या ३५ सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करत त्यांना गौरविण्यात आले.

अग्निशामकची आवश्यकता पडावी अशी वेळ येऊ नये. परंतु, दुर्दैवाने अशी वेळ आलीच तर खेड्यापाड्यापर्यंत गाडी पोहोचून उपाययोजनेसाठी सुविधा उपलब्ध असायला पाहिजे. त्यामुळे हानी टाळता येणार असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विकास कामे करत असताना समोरचा वेगळेच भारुड गातो. परंतु, आम्हीही ग्रामीण भागातील असल्याने बोलू शकतो. परंतु, आमच्यावर तसे संस्कार नाही, असा टोला माजी मंत्री एकनाथ खडसेंना नाव न घेता आ.चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

बोदवड शहरात सध्या साडेअकरा कोटींची कामे सुरू आहे. शहरासाठीची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच मंजूर होणार आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठकही पार पडली आहे. ही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यावर आहे. जामठी येवती टप्पा दोनचे भूमिपूजन लवकरच होणार असून काम सुरू होणार आहे. याबाबतीत मुख्यमंत्र्यांकडे बैठक झालेली असून टप्पा २ च्या निधीबाबत नियामक मंडळाची मंजुरी मिळालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सरकारला एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. येत्या वर्षभरात ९० टक्के कामे केल्याशिवाय राहणार नाही, असेही आ. पाटील यांनी सांगितले.

शहरातील मराठी शाळेत कॉम्प्लेक्स मंजूर झाले आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. घरकुल यादीतून नाव वगळलेल्यांना पुन्हा लाभ देण्यासाठी राज्याची मोदी आवास ही योजना सुरू केली आहे. रमाई, शबरीच्या माध्यमातून घरकुल, धनगर वसाहत घरकुल योजना, यशवंतराव वसाहत योजना एनटी बांधवांसाठी सुरू केली आहे. जो घरकुलापासून वंचित आहे, त्याला घरकुल मिळणार आहे. सफाई कर्मचारी स्वच्छतेचा पाया आहे. नगर विकास खाते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर त्यांच्या वारसांना सामावून घेण्याबाबत प्रयत्नशील राहणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.

अग्निशामक बंबामुळे दूर होणार अडचण

जळगाव जिल्ह्यात “जिनिंग सिटी” म्हणून बोदवड शहराची ओळख आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षापासून अग्निशामक बंब बाबत मागणी होती. यापूर्वी सुरवाडे जंगल, आमदगाव- फरकांडा जंगल तसेच खेड्यागावात भीषण आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परिणामी अग्निशामक सेवा उपलब्ध नसल्याने आग वेळीच आटोक्यात आणण्यासाठी मोठी अडचण होत होती. आता अग्निशामक बंबाची सेवा शहरात उपलब्ध झाल्याने अडचण दूर झाली आहे. यावेळी बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, नगरसेविका, नगरसेवक , व्यापारी असोसिएशन, जिनिंग असो., शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेना तसेच नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here