ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना मिळाला प्रतिसाद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सीबीएसई पॅटर्न) येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवीतील तेजस्विनी बेदरकर हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिला ‘झेंडावंदन’चा मान देण्यात आला. यावेळी शाळेतील १०० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात पालक-शिक्षक संघाचे सदस्य, शिक्षक वर्ग आणि पालक सहभागी झाले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त नृत्य स्पर्धेत प्रथम व गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पारोळा येथे आयोजित ध्यानचंद टेनिस क्लबद्वारा आयोजित क्रिकेट टुर्नामेंटमध्ये विजयी विद्यार्थ्यांना पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
देशभक्तीपर गीतांवर नृत्यासह गीतगायन
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले तर इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतगायन केले. शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांच्याह पालक-शिक्षक संघाचे सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन तिसरीतील आदीत मुसळे, चित्रांग मानोरे यांनी केले.