साईमत, भडगाव : प्रतिनिधी
शहरासाठी १३३ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली आहे. त्यामुळे आगामी दीड वर्षात शहरवासीयांना दररोज शुध्द पाणी मिळणार असल्याची माहिती आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. योजनेत गिरणेवर पक्का बंधारा, जलशुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. शहरवासीयांना जो शब्द दिला होता, तो पूर्ण करता आल्याचे मोठे समाधान असल्याचे ते म्हणाले.
भडगाव शहरासाठी शासनाकडून १३३ कोटी खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजुर झाली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिध्द झाला. त्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. आगामी दीड वर्षात योजनेचे काम पूर्णत्वास येऊन शहरवासीयांना दररोज शुध्द पाणी मिळणार आहे. योजनेत गिरणा नदीवर कच्च्या बंधाऱ्याच्या जागी पक्का केटीवेअर बांधण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पाणी पाणीपुरवठा करणारे पंप हे सोलरवर असणार आहेत.
ड्रेनेजसाठी १०० कोटी आणणार
१३३ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजुर करण्यात यश आले आहे. आता पुढच्या टप्प्यात म्हणजे दीड ते दोन महिन्यात शहरासाठीच १०० कोटी खर्चाची भुयारी गटारी योजनेला मंजुरी मिळवून समांतरपणे ड्रेनेजचेही काम सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर रस्त्याचा डीपीआर तयार करून त्यासाठीही निधी आणणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी सांगितले. गिरणेवर पक्का बंधारा, जलशुद्धीकरण प्रकल्पासह पाणी पुरवठा योजना मंजुर करण्याचा शब्द शहरवासीयांना दिला होता. तो शब्द पूर्ण करून ऋण फेडता आल्याचे मोठे समाधान असल्याचे आ.किशोर पाटील यांनी सांगितले.
आमदारांचा जाहीर सत्कार करणार
आ. किशोर पाटील यांनी शहरासाठी तब्बल १३३ कोटी खर्चाची पाणी पुरवठा मंजुर करून पुढच्या ५० वर्षाचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. आमदारांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल त्यांची गावातून मिरवणूक काढून शहरवासीयांच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात करू, असे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. आ. किशोर पाटील यांनी जी कामे स्वप्नातही वाटत नव्हती, ती कामे मंजुर करून शहरात ऐतिहासिक कामे मार्गी लावले आहेत. गिरणेवर जुने मटन मार्केट ते पेठ, वाक रस्त्यावरील पूल, तळणीचा विकासाच्या कामाला गती देऊन शहरवासीयांना मोठे गिफ्ट दिले आहे, असे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविकातून मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी योजना मंजुर करताना आलेल्या अडचणी, आमदारांनी केलेले अथक प्रयत्नांची माहिती दिली. सुत्रसंचालन विजयकुमार भोसले यांनी केले.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, पाचोरा-भडगाव बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, अल्पसंख्यांक सेलचे इमरानअली सय्यद, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, नंदकिशोर देवरे, जगन भोई, संतोष महाजन, शहरप्रमुख अजय चौधरी, रावसाहेब पाटील, जितेंद्र आचारी, सचिन मोराणकर, शैलेश पाटील, प्रवीण ब्राम्हणे, आमदाराचे स्विय सहाय्यक राजेश पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.
योजनेतील समाविष्ट कामे
शहरासाठी मंजुर झालेल्या पाणीपुरवठा योजनेत गिरणा नदीवर पक्का बंधारा, बंधाऱ्याजवळ जॅकवेल, जलशुद्धीकरण प्रकल्प, मुख्य जलवाहिनी, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पाणी साठविण्यासाठी १९ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ, वितरण व्यवस्था, नळ जोडण्या, सौर उर्जा प्रकल्प, पाईपलाईमुळे रस्ते खोदले जाणार आहेत, त्या रस्त्याची दुरूस्ती आदी कामांचा समावेश आहे.