‘इंडिया’च्या बैठकीत सामूहिक कार्यक्रम, संयोजकाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार?

0
12

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी

इंडिया आघाडीची आज (३१ ऑगस्ट) मुंबईत बैठक होत आहे.या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार, जागा वाटप कसे होणार,संयोजक कोण असणार या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान आजच्या बैठकीत इंडिया आघाडीचा सामुहिक कार्यक्रम,संयोजकाची नियुक्ती याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.या बैठकीला देशभरातील २८ पक्षांचे नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत.

या बैठकीची माहिती देण्याकरता महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्याव्ोळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.इंडिया आघाडीला अद्यापही संयोजक ठरवता आला नाही,ते पंतप्रधान काय ठरवणार अशी टीका भाजपाकडून सातत्याने केली जात आहे. यावरून पत्रकारांनी आज प्रश्न विचारल्यावर सुरुवातीला शरद पवारांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “इंडिया आघाडीच्या संयोजकासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम करू शकतो.या आधारे संयोजक ठरवू.”

पंतप्रधानपदासाठी अनेक पर्याय?
शरद पवार बोलत असतानाच उद्धव ठाकरे यांनीही त्यांंची प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की,“पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत पण भाजपाकडे काय पर्याय आहे? गेल्या १० वर्षांत त्यांनी काय केले? सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे.कर्नाटकात पाहिले आपण, कोणतेच यश मिळालं नाही. बजरंग बलीनेही त्यांना आशीर्वाद दिला नाही.”

जागा वाटपाबाबत काय?
शरद पवार म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही. पहिल्या दोन बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या. उद्याच्या बैठकीत इथून पुढे सामुहिक कार्यक्रम काय असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेव्ोळी असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी द्यावी लागेल. अन्य राजकीय घटक पक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र जाऊ शकतो का,या संदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागेल.

तर मोफत गॅस सिलेंडर
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे. ‌‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीपूर्वीच केंद्र सरकारने २०० रुपयांनी गॅस सिलिंडरचा दर कमी केला. ‌‘इंडिया’ जसं जसं पुढे जाईल, तसं एक दिवस असा येईल की, केंद्र सरकार मोफत गॅस सिलिंडर देईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

भारतमातेच्या रक्षणासाठी एकत्र
“मी पहिल्या बैठकीत सांगितले होते की, मी विरोधीपक्ष असा शब्द मानत नाही.आम्ही आमच्या देशाची रक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. भारतमातेचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हुकूमशहा आणि जुमलेबाजीला आमचा विरोध तर आहेच. संजय राऊत यांनी जसे म्हटले की, आमची तिसरी बैठक होणार आहे. तोपर्यंतच गॅस सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी झाले”, असे ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here