दोन महिला अटकेत, रामानंद नगर पोलिसांची कारवाई
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील महाबळ आणि आदर्श नगर परिसरात बांधकाम ठेकेदार किरण जगन्नाथ पवार यांच्या साईटवर ठेवलेले बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरी करणाऱ्या दोन महिलांना रामानंद नगरच्या पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या १० जून २०२५ ते ४ जुलै २०२५ या कालावधीत सेंट्रींगच्या प्लेटा, लोखंडी जॅक आणि शिंकज्या असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्यावरुन गुन्हा दाखल केला होता.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तांबापुर परिसरातील दोन महिला चोरीत सहभागी असल्याचे समजले. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून त्या महिलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी महाबळ आणि आदर्श नगर येथे रात्रीच्या वेळेस बांधकाम साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. त्या दोन महिलांची नावे संगीताबाई प्रभाकर चौधरी आणि हीराबाई दिलीप चव्हाण (दोन्ही राहणार तांबापुर, जळगाव) अशी आहेत. त्यांना १५ सप्टेंबर रोजी अटक केली. न्यायालयाने १८ सप्टेंबरपर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ४० हजार रुपयांच्या किंमतीच्या २० लोखंडी सेंट्रींगच्या प्लेटा हस्तगत केल्या आहेत.
कारवाईत यांचा होता सहभाग
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, सुशील चौधरी, जितेंद्र राठोड, विनोद सूर्यवंशी, योगेश बारी, हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, गोविंदा पाटील आणि अतुल चौधरी यांचा सहभाग होता. तपास पोलीस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहेत.